सामाजिक

लाखेवाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर; नागरिकांच्या समस्या एकाच ठिकाणी सोडविणार- जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले.

इंदापूर,दि १३

  • इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे नागरिकांच्या शासकीय कामकाजातील अडचणी सोडवण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी व अर्जांचा तातडीने निपटारा करणार आहेत.

या शिबिराला प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (मामा) उपस्थित राहणार आहेत. स्थानिक पातळीवर या शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद गटनेते श्रीमंत ढोले यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.हे शिबिर दि. १४ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून लाखेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागील परिसरात आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना अनेक शासकीय सेवा व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.विविध शासकीय सेवांचा लाभ‌ या समाधान शिबिरात जमिनीशी संबंधित अनेक प्रलंबित कामांचा निपटारा करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील चुका दुरुस्ती, डिजिटल ७/१२ व ८अ उतारे वाटप, तुकडेबंदी नियमितीकरण, जमीन वर्ग बदल, तसेच भूसंपादनाशी संबंधित कागदपत्रांची पूर्तता यांसारख्या कामांचा समावेश आहे.

तसेच लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत नागरिकांना जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलिअर प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवास / अधिवास प्रमाणपत्र आदी कागदपत्रांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.सामाजिक योजनांचे मार्गदर्शन
शिबिरात सामाजिक लाभाच्या विविध योजनांची माहिती व अर्ज स्वीकृतीही केली जाणार आहे. यामध्ये संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

याशिवाय एक खिडकी योजनेअंतर्गत ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, पी.एम. किसान योजना आणि तक्रार निवारण यांसारख्या सेवांचा देखील लाभ नागरिकांना मिळणार आहे.नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे शिबिर आयोजित करण्यात आले असून नागरिकांच्या प्रलंबित कामांना गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे शिबिर मोठी संधी ठरणार असून प्रशासनाशी थेट संवाद साधून समस्या सोडविण्याचा मार्ग खुला होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!