क्रीडा
शिरसोडीच्या भगिनींची सुवर्णझेप! राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत दुहेरी गोल्ड.

इंदापूर,दि २८
- सेलम (तामिळनाडू) येथे पार पडलेल्या पंधरा वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत शिरसोडी गावच्या दोन सख्ख्या बहिणींनी इतिहास घडवला आहे.कुमारी ज्ञानेश्वरी वृशेश्वर शिंदे हिने ४२ किलो वजन गटात, तर कुमारी गायत्री वृशेश्वर शिंदे हिने ४६ किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत दोघींनीही सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
शिरसोडी गावाची आणि इंदापूर तालुक्याची गोल्डन गर्ल म्हणून ओळखली जाणारी कुस्तीपटू कु.अहिल्या शत्रुघन शिंदे हिच्या पावलावर पाऊल ठेवत, तिला आदर्श मानून या दोन्ही बहिणींनी कठोर परिश्रम, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
या दैदीप्यमान यशामुळे शिरसोडी गावाचे नाव राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले असून, गावकऱ्यांमध्ये आनंद आणि अभिमानाचे वातावरण आहे.दोन्ही सुवर्णकन्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



