विशेष

इंदापूरमध्ये धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त इतिहास जागवणारा सांस्कृतिक सोहळा संपन्न.

शिस्तबद्ध आणि आदर्श आयोजनाने इंदापूरकर भारावले

इंदापूर,दि १६

  • इंदापूर शहराने शुक्रवारी एक ऐतिहासिक आणि अविस्मरणीय सांस्कृतिक सोहळा अनुभवला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त प्रथमच इंदापूरमध्ये सांस्कृतिक गीतांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. “शिवशंभो गर्जना” या नावाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः शहारे आणले. इतिहास, संस्कृती, पराक्रम आणि शिवभक्ती यांचा अनोखा संगम असलेल्या या कार्यक्रमाने संपूर्ण इंदापूर शहर शिवमय झाले होते.

प्रशांतमामा उंबरे युवा मंच, इंदापूर यांच्या वतीने इंदापूर नगरपालिकेसमोरील विस्तीर्ण परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रभर गाजलेला “ABHI – AAMU LIVE FOLK MUSICAL” हा सांस्कृतिक कार्यक्रम पहिल्यांदाच इंदापूरकरांच्या भेटीला आला होता. त्यामुळे कार्यक्रमाबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता होती. सायंकाळपासूनच कार्यक्रमस्थळी नागरिकांची गर्दी उसळू लागली होती.

या कार्यक्रमाला इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा, शहा स्कूलचे विश्वस्त मुकुंद शहा, माजी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, शोभा भरणे, शहा चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त वैशाली शहा, इंदापूर नगरपालिकेचे गटनेते शकील सय्यद, नगरसेविका मयुरी उंबरे, नगरसेविका दीप्ती राऊत, विविध नगरसेवक तसेच प्रशांतमामा उंबरे परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचे कौतुक करत, “इतिहास आणि संस्कृती जपणारे असे कार्यक्रम समाजासाठी प्रेरणादायी असतात,” असे मत व्यक्त केले.युवकांच्या आयोजन कौशल्याचे कौतुक प्रशांतमामा उंबरे युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली होती. मंच उभारणीपासून नागरिकांच्या सुविधांपर्यंत प्रत्येक गोष्टीचे नियोजन काटेकोरपणे करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला.

कार्यक्रमानंतर अनेक नागरिकांनी आयोजकांचे अभिनंदन करत, “इंदापूरमध्ये अशाच दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन भविष्यातही व्हावे,” अशी अपेक्षा व्यक्त केली.धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला हा ऐतिहासिक सांस्कृतिक सोहळा इंदापूरकरांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना कार्यक्रमानंतर सर्वत्र व्यक्त होत होती.

कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथांवर आधारित गीत, पोवाडे, गवळणी, महाराष्ट्र गीत आणि लोकसंगीत सादर करण्यात आले. कलाकारांनी सादर केलेल्या प्रत्येक गीतामध्ये इतिहासातील पराक्रम, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याचा अभिमान जिवंत झाला होता.
रनवाद्यांच्या गजरात सादर होणाऱ्या गीतांनी उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले. “जय भवानी… जय शिवाजी…” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. युवकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक जण या कार्यक्रमात तल्लीन झाला होता.

मुख्य सादरकर्ते अभिजीत जाधव आणि अमु जाधव यांनी आपल्या दमदार आवाजाने आणि प्रभावी सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्यासोबत आलेल्या कलाकारांनीही पोवाडे आणि लोकगीतांमधून शिवकालीन इतिहास जिवंत केला. अनेकांनी मोबाईलच्या फ्लॅशलाइट सुरू करून कलाकारांना दाद दिली.

  • या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महिलांसाठी करण्यात आलेली स्वतंत्र बैठक व्यवस्था. मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये महिलांना अनेकदा गैरसोयींना सामोरे जावे लागते. मात्र या कार्यक्रमात महिलांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित आसन व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे महिला वर्ग मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहिला होता.

महिलांनीही या आयोजनाचे विशेष कौतुक केले. “अशा प्रकारची व्यवस्था प्रत्येक कार्यक्रमात असायला हवी,” अशी भावना अनेक महिलांनी व्यक्त केली. युवक स्वयंसेवकांनी संपूर्ण कार्यक्रमादरम्यान शिस्त राखण्यासाठी विशेष मेहनत घेतली. त्यामुळे कोणताही गोंधळ न होता कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.वाहतूक व्यवस्था, पार्किंग, ध्वनी व्यवस्था, प्रकाशयोजना आणि नागरिकांसाठी बसण्याची सुविधा यांचेही उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे कार्यक्रमाला “आदर्श आयोजन” अशीच नागरिकांकडून प्रतिक्रिया मिळत होती.

विशेष म्हणजे, कार्यक्रमामध्ये केवळ मनोरंजन नव्हते तर इतिहासाची प्रेरणा आणि सामाजिक संदेशही होता. धर्मवीर संभाजी महाराजांचे बलिदान, स्वराज्याप्रती निष्ठा आणि राष्ट्राभिमान यांचे महत्त्व कलाकारांनी गीतांमधून प्रभावीपणे मांडले. त्यामुळे युवक वर्गाला प्रेरणा देणारा हा कार्यक्रम ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!