विशेष

अपघातातील गंभीर जखमी रुग्णाला वेळेवर ऑक्सिजन नाही; नातेवाईकांचा इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात संताप.

सामाजिक कार्यकर्त्या निशा शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतरच उपचार सुरू.

इंदापूर,दि २२

  • पंढरपूरकडे पायी वारी करणाऱ्या वारकऱ्याचा इंदापूर शहरातील मुख्य रस्त्यारस्त्यावर अपघात होऊन तो गंभीर जखमी झाल्यानंतर सदर रुग्णाला इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी सदर अपघातग्रस्त रुग्णावर उपचार करताना हलगर्जीपणा केल्याचा गंभीर आरोप नातेवाईक यांनी केला आहे.

अकोला जिल्ह्यातील अरुण मोतीराम ऐनकर हे वारकरी अपघातात गंभीर जखमी झाले. डोक्याला गंभीर मार लागून ते बेशुद्ध अवस्थेत असताना त्यांना तातडीने उपचारांची गरज होती. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतरही त्यांना वेळेवर ऑक्सिजन देण्यात आला नाही, असा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.

जखमी रुग्ण अत्यवस्थ असताना डॉक्टर व कर्मचारी नेमके कुठे होते? असा सवाल उपस्थित होत आहे. पहाटे रुग्णालयात पोहोचलेल्या नातेवाईकांना रुग्ण कुठे आहे, याची माहिती देण्यासाठी एकही जबाबदार कर्मचारी उपलब्ध नव्हता, ही बाब अधिकच धक्कादायक आहे.

इंदापूर शहरातील सामाजिक कार्यकर्त्या निशा शिंदे यांनी रुग्णालयात धाव घेत संबंधित डॉक्टरांना जाब विचारल्यानंतरच रुग्णावर उपचार सुरू करण्यात आले. त्यांच्या हस्तक्षेपानंतरच रुग्णाला ऑक्सिजन लावण्यात आल्याचे समोर आले आहे.

या घटनेमुळे इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा निष्काळजी व बेफिकीर कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रुग्णांचे प्राण धोक्यात असताना अशी हलगर्जीपणा का? जबाबदारी कोणाची? असे तीव्र प्रश्न उपस्थित होत आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या निशा शिंदे यांनी रुग्णालयातील डॉक्टर व नर्स यांची कमतरता आणि ढिसाळ कामकाजावर जोरदार टीका करत तात्काळ सुधारणा न झाल्यास रुग्णालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या प्रकारावर प्रशासन काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!