अजितदादा’ बारामतीमधूनच विधानसभा लढणार.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून चर्चेला पूर्णविराम.
पुणे,दि.१४
- राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचा बारामती हाच डीएनए आहे. त्यामुळे अजित पवार हे बारामती मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहेत.पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे ‘महाराष्ट्र व्हीजन २०५०’ या विशेष कार्यक्रमात सुनील तटकरे बोलत होते.
याप्रसंगी तटकरे यांनी पक्षाची सविस्तर भूमिका मांडली. सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून लढण्यात फार रस नसल्याचे बोलून दाखवले. त्यासंदर्भात तटकरे म्हणाले, अजित पवार हे बारामती मतदारसंघातून लढणार आहेत.
त्यांना बारामतीमध्येच रस आहे. अजित पवार म्हणजेच बारामती आणि बारामती हाच त्यांचा डीएनए आहे, असे सांगत तटकरे यांनी अजित पवारांच्या उमेदवारीबाबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
त्याचप्रमाणे महायुतीत विधानसभा निवडणुकीत जागावाटपाची चर्चा होत असून, त्याबाबत बोलणी फार पुढे गेली आहेत. जागा वाटपाचा तपशील लवकरच जाहीर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढच्या २५ वर्षांत राज्यातील पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला गेला पाहिजे. त्यासाठी काही प्रमाणात निधी उभारावा लागेल. सध्या महाराष्ट्रावर मोठे कर्ज आहे, अशी टीका होते. मात्र, राज्यातील उत्पन्नाचा विचार करता आणि निती आयोगाच्या नियमानुसार हे प्रमाण कमी आहे.