अजितदादांचा इंदापूर मधील उमेदवार ठरला ; हर्षवर्धन पाटील लवकरच ‘तुतारी’ हाती घेणार ?
पश्चिम महाराष्ट्रात लवकरच भाजपला खिंडार...?
इंदापूर,दि.१४
- विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जवळपास १३४ उमेदवार निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच निश्चित केलेल्या उमेदवारांना आपापल्या मतदारसंघात कामाला लागण्याचे आदेश पक्ष नेतृत्व व माहितीतील नेत्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
निश्चित करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे-८२ तर शिवसेना-२५,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे-२७ उमेदवार आहेत . निश्चित केलेल्या या जागांमध्ये साधारणपणे सीटिंग आमदाररांना संधी देण्यात आली आहे.
त्यामध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व अजित पवार यांचे समर्थक दत्तात्रय भरणे यांना पुन्हा इंदापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून संधी दिल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून मिळत आहे. त्यामुळे भरणे यांचे नाव निश्चित झाल्याने भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे लवकरच शरदचंद्रजी पवार या पक्षात प्रवेश करून तुतारी हाती घेत इंदापूर विधानसभेची निवडणूक भरणे यांच्या विरोधात लढवणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांच्या माध्यमातून मिळाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा महायुतीसह राज्यामध्ये चर्चेत आलेल्या मतदार संघ या मतदारसंघावरून महायुतीमध्ये फूट पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र महायुती मधील नेत्यांनी सिटिंग आमदारांना संधी देण्याचे मान्य केल्याने हर्षवर्धन पाटील यांना “अपक्ष’ अन्यथा शरदचंद्रजी पवार पक्षात जाऊन हाती “तुतारी’ घेत भरणे यांच्या विरोधात उभे राहावे लागणार आहे.
काही दिवसांमध्ये हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसहित राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपला निर्णय कळवणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महायुती सह भाजपला मोठे खिंडार पडणार असल्याचे निश्चित झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना गणेश विसर्जनानंतर पूर्णविराम मिळणार आहे.
खा.सुप्रिया सुळे यांचे सूचक वक्तव्य व शरद पवार यांच्याबरोबर बंद दाराआड चर्चा..?
- इंदापूर तालुक्यात ठीक ठिकाणी घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकी व मेळाव्यानंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुण्यामध्ये माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्यासोबत तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा केल्याची माहिती समोर आली होती. त्या अगोदर व नंतर हर्षवर्धन पाटील यांचं काम हे फक्त इंदापूरपुरते नाही तर त्यांचे काम राज्यभर आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सूचक वक्तव्य गेले होते. त्यामुळे हर्षवर्धन पाटील काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.