मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेलेल्या सरडेवाडी च्या रामचंद्र जमदाडे यांचा अपघातात मृत्यू.

इंदापूर,दि ३१
- मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी झटणारा एक लढवय्या कार्यकर्ता आज काळाच्या पडद्याआड गेला. समाजाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवणारे, मराठा आंदोलनात नेहमी अग्रस्थानी दिसणारे सरडेवाडी (ता. इंदापूर) येथील रामचंद्र शंकर जमदाडे यांचे बीडजवळ झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सरडेवाडी गावासह संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
रामचंद्र जमदाडे हे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून परिचित होते. मराठा समाजाच्या प्रश्नांवर होणाऱ्या आंदोलनांमध्ये त्यांची उपस्थिती हमखास असायची. आंदोलन, मोर्चे, बैठका असोत किंवा समाजाच्या न्याय हक्कासाठीचा लढा, रामचंद्र जमदाडे हे नेहमी पुढाकार घेताना दिसत असत.त्यांच्या मोबाईलच्या स्टेटसवरही कायम मनोज जरांगे पाटील यांचे छायाचित्र किंवा मराठा आरक्षणाशी संबंधित संदेश झळकत असत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, समाजाच्या पिढ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठी ते मनापासून कार्यरत होते.
सामाजिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही त्यांची ओळख होती. ते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे निष्ठावंत आणि सक्रिय कार्यकर्ते होते. गावातील अनेक सामाजिक उपक्रम, जनसंपर्क मोहिमा आणि विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असायचा. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार आणि जनसंपर्कही मोठा होता.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते इतर सहकाऱ्यांसह बीडकडे रवाना झाले होते. मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते. बीडजवळ त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात रामचंद्र जमदाडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
रामचंद्र जमदाडे यांच्या अकाली निधनाने केवळ त्यांच्या कुटुंबावरच नव्हे, तर मराठा समाज, मित्रपरिवार आणि सरडेवाडी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. समाजासाठी झटणारा, मित्रांसाठी कायम धावून जाणारा आणि आपल्या विचारांशी प्रामाणिक राहणारा एक कार्यकर्ता हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
आज सरडेवाडीतील अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आहेत. कारण, समाजासाठी जगणारा आणि मराठा आरक्षणाच्या लढ्यात स्वतःला झोकून देणारा एक निष्ठावंत शिलेदार कायमचा निघून गेला आहे. त्याच्या आठवणी मात्र गावकऱ्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या मनात कायम जिवंत राहतील.



