INDAPUR breaking/इंदापुरात तहसीलदारांविरोधात सर्वपक्षीयांचा एल्गार; तर दुसऱ्या बाजूला बनसोडेंच्या समर्थनार्थ कोणाची फौज उतरणार?

इंदापूर,दि १८
- इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कार्यपद्धतीविरोधात आता तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. तहसीलदारांच्या विरोधात येत्या २५ नोव्हेंबर रोजी इंदापूर नगरपालिका ते तहसील कार्यालय असा हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागातून विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या मोर्चाला भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, काँग्रेस, शेतकरी संघटना यांच्यासह विविध पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
तहसीलदार जीवन बनसोडे हे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाहीत, कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी उद्धटपणे व अपमानास्पद वर्तन करतात, असा आरोप सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात येत आहे. तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिकांनाही सन्मानपूर्वक वागणूक मिळत नसल्याचा दावा करण्यात येत आहे. तहसीलदारांची कार्यपद्धती ही लोकाभिमुख नसून मनमानी स्वरूपाची असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात आता विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते एकवटले आहेत.
मात्र या सर्व घडामोडींमध्ये आता आणखी एक नाट्यमय राजकीय वळण समोर येत आहे. तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या समर्थनार्थ उद्या इंदापुरात पत्रकार परिषद आयोजित केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एवढेच नव्हे, तर तहसीलदारांच्या समर्थनार्थ काही नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून स्वतंत्र मोर्चा काढण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे. २५ नोव्हेंबरच्या सर्वपक्षीय मोर्चाला विरोध करण्यासाठी ही रणनीती आखली जात असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
त्यामुळे आता इंदापुरात खरा राजकीय संघर्ष रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एका बाजूला तहसीलदारांच्या कार्यपद्धतीविरोधात सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांचा आक्रोश, तर दुसऱ्या बाजूला तहसीलदारांच्या समर्थनार्थ उभे राहणारे नेते नेमके कोण असणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
समर्थनार्थ कोण? आणि विरोधात कोण?
- तहसीलदारांच्या समर्थनार्थ नेमके कोणते राजकीय नेते पुढे येणार? कोणत्या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या भूमिकेत सहभागी होणार? तसेच तालुक्यातील विविध व्यावसायिक आणि संघटनांची भूमिका काय असणार? हे उद्याच्या पत्रकार परिषदेनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या दोन्ही बाजूंच्या भूमिकांमध्ये वाळूमाफिया आणि अवैध व्यावसायिकांची भूमिका काय असेल, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र या संदर्भातील आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
एकंदरीत, इंदापुरात २५ नोव्हेंबरला निघणारा सर्वपक्षीय मोर्चा केवळ तहसीलदारांविरोधातील आंदोलन न राहता तालुक्यातील राजकीय शक्तिप्रदर्शन ठरण्याची शक्यता आहे. उद्याच्या पत्रकार परिषदेत कोणती भूमिका मांडली जाते आणि तहसीलदारांच्या समर्थनार्थ कोण पुढे येते, यावरच पुढील राजकीय समीकरणे अवलंबून असतील.
जनतेच्या प्रश्नांसाठीचा लढा की अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ राजकीय शक्तिप्रदर्शन? इंदापूरकरांचे लक्ष आता उद्याच्या पत्रकार परिषदेकडे आणि २५ नोव्हेंबरच्या मोर्चाकडे लागले आहे!



