कृषी

इंदापूर तालुक्यात ऑनलाइन खत खरेदी-विक्रीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद.

FFS मोबाईल ॲपद्वारे खत खरेदी प्रक्रिया सुलभ; शेतकऱ्यांना स्वतःच्या क्षेत्रानुसार खत आरक्षित करण्याची सुविधा.

  • इंदापूर,दि १७

    राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत दिनांक २२ सप्टेंबर २०२६ पासून संपूर्ण राज्यात ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (Framework for Fertilizer Sale – FFS) या मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन खत खरेदी-विक्री प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीला इंदापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने खत खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.

या प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या शेतजमिनीच्या क्षेत्रानुसार आवश्यक खतांचे ऑनलाइन आरक्षण करता येत आहे. त्यानंतर FFS मोबाईल ॲपद्वारे फार्मर आयडी किंवा आधार क्रमांकाच्या आधारे तयार होणारा QR कोड विक्रेत्याकडे स्कॅनिंगसाठी दाखविल्यानंतर शेतकऱ्यांना खत खरेदी करता येत आहे. त्यामुळे खत खरेदी-विक्री प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासोबतच खत वितरण व्यवस्थाही अधिक सुलभ होण्यास मदत होत आहे.

सदर ऑनलाइन खत खरेदी प्रणालीची माहिती तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत संपूर्ण तालुक्यात जनजागृती कार्यक्रम, मार्गदर्शन व प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी या प्रणालीचा लाभ घेऊन ऑनलाइन पद्धतीने खतांचे आरक्षण करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, इंदापूर श्री. दीपक गरगडे यांनी केले आहे. तसेच ऑनलाइन बुकिंग करताना काही अडचणी उद्भवल्यास संबंधित कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.

FFS प्रणालीद्वारे खत खरेदी करणे अनिवार्य असल्याने सर्व शेतकरी बांधवांनी FFS मोबाईल ॲपची माहिती करून घेऊन त्याचा वापर करावा. तसेच खत विक्रेत्यांनीही ऑनलाइन बुकिंग प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य करावे. कोणत्याही शेतकऱ्याची खत खरेदी करताना गैरसोय होणार नाही, याची दक्षता सर्व विक्रेत्यांनी घ्यावी, अशा सूचना कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) श्री.योगेश फडतरे यांनी तालुक्यातील खत विक्रेत्यांना दिल्या आहेत.

शेतकऱ्यांसाठी खत खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ व सुव्यवस्थित करण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या या ऑनलाइन प्रणालीचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इंदापूर तालुका कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!