विशेष

Road Roko/ उजनीतील AI डेटा सेंटरविरोधात ३१ ऑक्टोबरला रस्ता रोको!

आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन; महारुद्र पाटील यांची माहिती

इंदापूर,दि २५

  • पुणे, सोलापूर, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरण परिसरात प्रस्तावित AI डेटा सेंटर आणि सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात ३१ ऑक्टोबर रोजी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी दिली.

उजनी धरण परिसरात उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पांमुळे पर्यावरण, जलस्रोत, शेती आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती आंदोलकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित प्रकल्प तातडीने रद्द करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

जलतज्ज्ञ कृष्णाजी ताटे यांनी या प्रकल्पांमुळे उजनीच्या पाण्याच्या गुणवत्तेवर आणि परिसरातील परिसंस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली. पाणी दूषित झाल्यास शेती, जलचर आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच उजनीच्या पाण्याचा प्रवाह पुढे चंद्रभागा नदीपर्यंत जात असल्याने या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, उजनी धरणाच्या उभारणीसाठी धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या सुपीक जमिनी दिल्या आहेत. मात्र, आता याच परिसरात नवे प्रकल्प उभारले जात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे. या प्रकल्पांना आपला तीव्र विरोध असून, सरकारने स्थानिक नागरिकांच्या हिताचा विचार करून निर्णय घ्यावा, अशी भूमिका अमोल भिसे यांनी मांडली.

AI डेटा सेंटर आणि सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे उजनी परिसरातील पर्यावरणीय संतुलन बिघडण्याची शक्यता आंदोलकांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी ३१ ऑक्टोबर रोजी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!