कृषीक्राईम

INDAPUR/तीन वर्षे विश्वासाने काम करणाऱ्या ऊसतोड टोळीचा शेतकऱ्याला सात लाखांचा गंडा? हिंगणगावातील शेतकऱ्याची तक्रार.

इंदापूर,दि १३

  • इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथील शेतकरी संदीप सुभाष गायकवाड यांची ऊसतोड कामगार आणि मुकादमाकडून सात लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. विशेष म्हणजे, संबंधित ऊसतोड टोळी गेल्या तीन वर्षांपासून गायकवाड यांच्याकडे काम करत होती. मात्र, यंदाच्या ऊसतोड हंगामात त्यांची फसवणूक झाल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.

संदीप गायकवाड यांनी यंदाच्या ऊसतोड हंगामासाठी नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याबरोबर करार केला होता. ऊसतोड कामगार पुरविण्याचे आश्वासन मुकादम भाईदास युवराज भिल (रा. खोकरपाट, ता. अमळनेर, जि. जळगाव) यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे. या व्यवहारातून गायकवाड यांनी रोख आणि ऑनलाइन पद्धतीने एकूण सात लाख रुपये दिल्याचा दावा केला आहे.

संबंधित ऊसतोड कामगार हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील खोकरपाट, देवभाने, हिंगणी आणि परिसरातील गावांतील असल्याची माहिती आहे. या प्रकरणात शेतकऱ्याकडे संबंधित मुकादम आणि ऊसतोड कामगारांच्या नावाने केलेली नोटरी तसेच कोरे चेक उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या कागदपत्रांसह आर्थिक व्यवहारांची चौकशी केल्यास प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होण्यास मदत होऊ शकते.

गेल्या तीन वर्षांपासून एकाच ऊसतोड टोळीवर विश्वास ठेवून काम करणाऱ्या शेतकऱ्याला यंदा सात लाख रुपयांच्या व्यवहारातून आर्थिक फटका बसल्याचा आरोप आहे. सर्वसामान्य कुटुंबातील संदीप गायकवाड शेतीच्या माध्यमातून प्रगती करण्याचा प्रयत्न करत असताना एवढी मोठी रक्कम अडकल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

ऊसतोड कामगार पुरविण्याच्या नावाखाली शेतकरी आणि ट्रॅक्टर मालकांची फसवणूक होत असल्यास अशा प्रकारांना आळा घालणे आवश्यक आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित मुकादम आणि कामगारांची भूमिका तपासावी, दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आणि शेतकऱ्याला त्याचे पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!