
इंदापूर,दि १
- पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज इंदापूरमध्ये करण्यात आला. प्रचाराचा नारळ फोडून सावंत यांच्या निवडणूक प्रचाराला इंदापूरमधून सुरुवात करण्यात आली. यावेळी शिक्षक, समर्थक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आता चांगलीच रंगू लागली असून दत्तात्रय सावंत यांनीही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरातील नामदेव पायरीचे दर्शन घेत त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला होता. त्यानंतर मतदारसंघातील विविध भागांत शिक्षकांशी संपर्क साधण्याची मोहीम सुरू आहे.
- इंदापूरमध्ये दत्तात्रय सावंत सर यांच्या प्रचाराचा नारळ फुटताच शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिक्षकांचा वाढता सहभाग आणि मिळणारा सकारात्मक प्रतिसाद सावंत यांच्या प्रचाराला नवी ऊर्जा देणारा ठरत आहे.
इंदापूरमध्ये झालेल्या या प्रचारशुभारंभामुळे तालुक्यातील शिक्षक मतदारांमध्येही निवडणुकीच्या चर्चेला वेग आला आहे. शिक्षकांचे विविध प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील प्रलंबित मागण्या, सेवा विषयक प्रश्न, अनुदान, पेन्शन तसेच शिक्षकांच्या हक्कांसाठी पाठपुरावा करण्याचा मुद्दा प्रचारात केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचा विस्तार मोठा असून पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षकांशी थेट संपर्क साधणे आणि त्यांच्या प्रश्नांना जाणून घेणे, हे आगामी प्रचाराचे महत्त्वाचे अंग ठरणार आहे.
दरम्यान, सावंत यांच्या उमेदवारीबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार नसल्याचे सांगितले असून भाजप तसेच महाविकास आघाडी या दोन्ही पर्यायांबाबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी यापूर्वी सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या अधिकृत उमेदवारीकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रकही जाहीर झाले असून ६ ऑक्टोबर २०२६ ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. २३ ऑक्टोबर रोजी मतदान, तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
इंदापूरमधून प्रचाराचा नारळ फोडत सावंत यांनी शिक्षक मतदारसंघातील निवडणूक तयारीला आणखी वेग दिला आहे. आगामी काळात तालुक्यातील शिक्षकांशी संवाद, बैठका आणि संपर्क दौरे यामुळे इंदापूरमधील शिक्षक मतदारसंघाचे राजकारण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.



