Babulgaon(Indapur)/ बाभूळगाव पोस्को,ॲट्रॉसिटी गंभीर गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करा:- शिवाजीराव मखरे.
आर पी आय (आठवले गट )च्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन; अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात त्वरित कारवाईची मागणी.

इंदापूर,दि ३
- इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बाभुळगाव पोस्को व ॲट्रॉसिटी गंभीर गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अन्यथा स्वातंत्र्य दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२६ रोजी इंदापूर पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वतीने पुणे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे यांनी दिला आहे.यासंदर्भात बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चेतन कदम यांना निवेदन सादर करण्यात आले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जुलै २०२६ मध्ये इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी सुभाष डरंगे, शिवाजी जगताप आणि दशरथ आसबे यांच्याविरोधात अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र, इतका गंभीर गुन्हा दाखल होऊनही संबंधित आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, या प्रकरणातील आरोपींकडून फिर्यादीला सातत्याने धमकावण्याचा प्रयत्न होत असून त्यामुळे पीडित कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आरोपींविरोधात यापूर्वीही विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे नमूद करत त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, आरोपींकडून अटक टाळण्यासाठी किंवा अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत पोलीस प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे कारवाई करून आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान, या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास १५ ऑगस्ट २०२६ रोजी इंदापूर पोलीस ठाण्यासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.


