विशेष

Goat thieves /इंदापूर तालुक्यात शेळी चोरांचा सुळसुळाट; शिदवस्ती येथून दोन पाटी व एक शेळी चोरी, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण.

इंदापूर, दि. २८

  • Goat thieves /इंदापूर तालुक्यात अलीकडच्या काळात शेळ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पशुपालक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. तालुक्यातील विविध भागांमध्ये गोठ्यात बांधलेल्या शेळ्या रात्रीच्या वेळी चोरून नेण्याच्या घटना वारंवार घडत असून, त्यामुळे शेळीपालन व्यवसायावरच संकट निर्माण झाले आहे.

अशाच प्रकारची घटना तालुक्यातील शिदवस्ती (सरडेवाडी) येथे घडली. नवनाथ शंकर कदम (रा. सरडेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या दोन पाटी व एक शेळी अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दावी तोडून चोरून नेल्या. चोरीस गेलेल्या जनावरांची अंदाजे किंमत २० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मेहनतीने वाढवलेल्या शेळ्या क्षणार्धात चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह शेळीपालनावर अवलंबून असल्याने अशा चोरीच्या घटना त्यांच्या अडचणी आणखी वाढवत आहेत.

पशुपालकांनी रात्रीच्या वेळी गोठ्यांची अधिक काळजी घेण्याबरोबरच गोठे, शेळ्या-मेंढ्यांचे व गाई-म्हशींच्या निवाऱ्यांजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास चोरट्यांवर काही प्रमाणात वचक निर्माण होऊ शकतो तसेच चोरीच्या घटनांचा तपास करण्यास पोलिसांनाही मदत होऊ शकते.

दरम्यान, तालुक्यात वाढत्या शेळी चोरीच्या घटनांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, संशयितांवर लक्ष ठेवावे आणि शेळी चोरांच्या टोळ्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी पशुपालक शेतकऱ्यांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!