इंदापूर बाजार समितीत हमीभावात मका खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू.

इंदापूर,दि १७
- इंदापूर बाजार समितीच्या मुख्य बाजारात रब्बी हंगाम २०२६ साठी शासकीय हमीभाव दरात मका खरेदी केंद्रासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली असल्याची माहिती सभापती संदीप पाटील यांनी दिली.
हमीभाव दरात मका विक्री करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी २०२६ मधील रब्बी पिकाची नोंद असलेला डिजिटल ७/१२ व ८-अ उतारा, अद्ययावत आधारकार्ड, आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक, तसेच बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स सादर करणे आवश्यक आहे. नोंदणी प्रक्रिया बायोमेट्रिक पद्धतीने होत असल्याने संबंधित शेतकऱ्यांनी स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
दरम्यान, मुख्य व उपबाजार भुसार मार्केटमध्ये नव्या ज्वारी, गहू व हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. ज्वारीला प्रति क्विंटल सुमारे ६,००० रुपये, गव्हाला ३,२०० रुपये तर हरभऱ्याला ५,२०० रुपये इतका उच्चांकी दर मिळाला आहे. तसेच पेरूला प्रति किलो ८ ते ४१ रुपये, तर कांद्याला प्रति क्विंटल ३०० ते १,३०० रुपये दर मिळत आहे.
मका विक्रीसाठी शेतकऱ्यांनी ३० एप्रिल २०२६ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी केले आहे.
शेतमालाच्या दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा या उद्देशाने बाजार समितीने अकलुज रोडलगतच्या बाजार आवारात धान्य सफाई यंत्राची सुविधा सुरू केली आहे. या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती संदीप पाटील व उपसभापती रुपालीताई संतोष वाबळे यांनी केले.



