विशेष

भीमा नदीकाठच्या गावांना दिलासा;उजनीतून भीमा नदीत शनिवारपासून पाणी सोडण्याचा निर्णय -हर्षवर्धन पाटील.

उजनीचे पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन.

इंदापूर,दि १७

  • उजनी धरणातून भीमा नदीमध्ये शनिवार पासून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उजनीतून भीमा नदीमध्ये एकूण २ वेळा पाणी सोडणेसाठी ७ टीएमसी पाणी राखून ठेवण्याचा निर्णयही आज गुरुवारी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी या बैठकीनंतर गुरुवारी दिली.

भीमा नदीकाठच्या असलेल्या गावांमधील व नदीच्या पाण्यावरती अवलंबून असणाऱ्या पिण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनांसाठी त्याचबरोबर जनावरांना पिण्यासाठी शनिवार पासून नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे समवेत झालेल्या ऑनलाईन बैठकीला हर्षवर्धन पाटील यांचेसह कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच सोलापूर जिल्हाधिकारी व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

उजनी धरणामध्ये सध्या ८० टीएमसी पाणी शिल्लक असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टीएमसी पाणी जास्त आहे. उद्या शनिवारी भीमा नदीपात्रात पाणी सोडले नंतर, पुन्हा जून महिन्यात पाणी सोडणेसंदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समवेत मे महिन्यात बैठक होऊन निर्णय घेतला जाईल, असे या बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नमूद केल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

इंदापूर तालुक्यातील तसेच माढा तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी ८ दिवसापूर्वी हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर येथे भेटून निवेदन देऊन उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सु. स. खांडेकर अधिक्षक अभियंता उजनी धरण यांच्याशी भीमा नदीत पाणी सोडणे संदर्भात चर्चा केली होती.

उजनी पाणलोट क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पाण्याचा कोठा दिलेला आहे, त्यानुसार त्यांना पावसाळ्यापर्यंत पाणी पुरले पाहिजे तसेच उजनी पाणलोट क्षेत्रातील गावांच्या पाण्यावरती अवलंबून असणाऱ्या पिण्याच्या पाणी योजनांनाही पाणी कमी पडू देऊ नये, अशी बैठकीत हर्षवर्धन पाटील यांनी केलेली मागणी मान्य करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!