राजकीय
इंदापूर नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणानंतर “चाय पे चर्चा”ला राजकीय उकळी!
नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी सर्व पक्षीय नेत्यांची सार्वजनिक ठिकाणी चहापान बैठक.

इंदापूर,दि ९
- नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर इंदापूरमध्ये राजकीय तापमान झपाट्याने वाढू लागले आहे. येत्या महिन्यात होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थक एकत्र येऊन “चाय पे चर्चा” रंगवताना दिसत आहेत.
या चर्चांमध्ये आगामी निवडणुकीत कोणत्या वार्डात कोणाचा प्रभाव, कोणता उमेदवार पुढे येऊ शकतो, तसेच वार्डरचनेच्या बदलांमुळे निर्माण झालेली समीकरणे यावर चर्चा सुरू आहे. भावी नगरसेवकांच्या शक्य उमेदवारांची नावंही चर्चेत असून, एकमेकांना राजकीय कोपरखळ्या मारण्यात सर्वजण व्यस्त आहेत.
राजकीय वातावरणात उत्सुकता वाढली असून, “कोणत्या पक्षाची बाजू वरचढ ठरेल?” या प्रश्नावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. येत्या काही दिवसांत प्रचाराची हवा अधिकच तापेल, इतकं निश्चित!



