“आरोग्यदूत की जाहिरातदूत;रुग्णांचा सन्मान की राजकारणाच्या मंच.?
आरोग्यदूता कडून रुग्णांच्या गरिबीवर व स्वाभिमानावर घाला?

इंदापूर,दि.१९
- महाराष्ट्रात सध्या काही आमदार व विद्यमान मंत्री स्वतःला ‘आरोग्यदूत’ म्हणून जाहिरात करत आहेत. पुणे-मुंबई सारख्या धर्मदाय आयुक्तांद्वारे चालणाऱ्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना मोफत सेवा देऊन मदत केली जाते. मात्र, या मदतीसोबत केली जाणारी जाहिरातबाजी रुग्णांच्या गरिबी, प्रतिष्ठा व स्वाभिमानावर परिणाम घडवत असून
“आरोग्यदूत की जाहिरातदूत असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.
गंभीर व दुर्मिळ आजाराने आजारी असलेल्या रुग्णांना कधीच असे वाटत नाही की त्यांची आर्थिक परिस्थिती किंवा त्यांचा आजार समाजात उघड व्हावा. प्रत्येक जण आपला आजार आणि अडचण शक्य तितकी खाजगी ठेवू इच्छितो.मात्र, काही लोकप्रतिनिधी ‘आरोग्यदूत’ म्हणून जाहिरात करताना रुग्णांची माहिती सर्वांसमोर आणतात. त्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावतो आणि समाजातील लोक त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतात.
रुग्णांचे ठाम मत असते की तुम्हाला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देताना बहुमूल्य मत दान केले आहे. त्यामुळे आम्ही अडचणीत असताना तुम्ही मदत करणे हे कार्य प्राप्त आहे. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मदत करा,आम्हाला आनंदच होईल. पण आमच्या नावाची व आजाराची जाहिरात करू नका. आम्हाला उपकार नकोत, आम्हाला सन्मान हवा असे रुग्णांचे मत असते.
इंदापूर तालुक्यात भिगवण ग्रामपंचायतमधील ट्रॉमा केअर सेंटर सहा महिन्यांपासून डॉक्टरविना आहे. ग्रामस्थांनी सातत्याने आंदोलने व निवेदनं दिली, तरी डॉक्टरांची नियुक्ती झालेली नाही.गावकऱ्यांचा थेट सवाल आहे की आम्हाला आमच्या “गावातच आरोग्याच्या सुविधा व्यवस्थित मिळत नाहीत, मग आमदार आरोग्यदूत कसे?
शासकीय निधी व सीएसआर फंडातून अनेक कामे होत असतात. परंतु प्रचार मात्र आमदारांच्या प्रतिष्ठानच्या नावाने केला जातो. प्रतिष्ठानचे नेमके योगदान किती आहे, हे अजूनही स्पष्ट नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होतो “फायदा खरंच लोकांना होतोय का, की फक्त आमदारांना?
रुग्णालये डॉक्टरविना, औषध पुरवठा अपुरा, ट्रॉमा सेंटर बंद, आणि दुसरीकडे ‘आरोग्यदूत’ म्हणून सोशल मीडियावर जाहिरातबाजी.म्हणूनच नागरिकांचा एकच सवाल ? हे खरेच आरोग्यदूत आहेत का? की फक्त जाहिरातदूत.?
बावडा ग्रामीण रुग्णालय – दहा वर्षांचा थांबलेला प्रवास..?
२०१५ मध्ये बावड्यात ग्रामीण रुग्णालयाची नवी इमारत बांधून झाली. आज दहा वर्ष उलटूनही ती पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. इमारत आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पण डॉक्टर व कर्मचारीच नाहीत.हीच परिस्थिती भिगवण, इंदापूर आणि इतर आरोग्य केंद्रांची आहे.
इंदापूर ग्रामीण रुग्णालयातही औषधांचा तुटवडा..?
इंदापूर ग्रामीण रुग्णालयातील परिस्थिती आणखी धक्कादायक आहे.साप किंवा कुत्रा चावल्यावर लागणारे जीव वाचवणारे इंजेक्शनसुद्धा वेळेवरती उपलब्ध होत नाही असे स्थानिकांचे मत आहे.नेत्याचा फोन आल्याशिवाय ते इंजेक्शन रुग्णालयात मिळत नाही.”यामुळे संपूर्ण सिस्टीम काही मोजक्या लोकांच्या पकडीत असल्याचा संशय निर्माण होतो.
टिंब टिंब प्रकरण – उपकार की अपमान?
विद्यमान लोकप्रतिनिधींनी काही दिवसांपूर्वी बावड्यातील टिंब- टिंब या व्यक्तीचा किस्सा भाषणात सांगितला. त्यांनी साध्या फोनवर मदत केली, असे त्यांनी दाखवले.मात्र टिंब टिंब यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. “एवढे मोठे आमदार जर साध्या फोनचे उपकार केल्यासारखे भाषा करत असतील, तर माझी चूक झाली की मी त्यांच्याकडे गेलो. माझ्या गावच्या नेत्याने मदत केली असती तर ती स्वाभिमान राखून केली असती, उपकार दाखवून नाही.



