तहसीलदार जीवन बनसोडेंची निष्पक्ष चौकशी करा; काँग्रेस तालुकाध्यक्ष मयूरसिंह पाटलांची पत्रकार परिषदेत मागणी.

इंदापूर,दि २४
- इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कार्यपद्धतीबाबत जनतेमध्ये नाराजी असून, त्यांची कार्यपद्धती लोकशाहीला घातक आहे असे स्पष्ट मत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मयूरसिंह पाटील यांनी व्यक्त केले. संबंधित अधिकारी कोणाच्यातरी दबावाखाली विशिष्ट हेतूने काम करत असल्याचा आरोप करत अशा अधिकाऱ्याच्या पाठीशी काँग्रेस पक्ष कधीही उभा राहणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षाने तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. या अधिकाऱ्याच्या कामकाजाची निष्पक्षपणे चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणीही मयूरसिंह पाटील यांनी केली.
सध्या इंदापूर तालुक्यात तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात सत्तेतील दोन पक्ष आमनेसामने आले आहेत. दोन्ही बाजूंकडून आंदोलनांची तयारी सुरू असून, या राजकीय संघर्षामुळे तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरू नये, असे आवाहन पाटील यांनी केले.
काँग्रेस पक्ष नेहमीच सर्वसामान्य माणसाचे हित केंद्रस्थानी ठेवून काम करत आला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात काँग्रेस पक्ष इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. संबंधित अधिकाऱ्याची निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कठोर कारवाई करावी, हीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, येत्या २५ तारखेला इंदापूरमध्ये होणाऱ्या कोणत्याही आंदोलनात काँग्रेस पक्ष सहभागी होणार नसल्याचेही तालुकाध्यक्ष मयूरसिंह पाटील यांनी स्पष्ट केले.



