Indapur big news/इंदापूरच्या तहसीलदारांची उचलबांगडी की शक्तीची रजा;२५ तारखेच्या मोर्चापूर्वीच मोठा निर्णय?
तहसीलदार जीवन बनसोडेंची खुर्ची धोक्यात!

इंदापूर,दि १९
- इंदापूरच्या महसूल विभागात सध्या मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या विरोधात आता सर्वपक्षीय नेत्यांनी एकजूट केली असून, येत्या २५ तारखेला त्यांच्या विरोधात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे भाजपचे नेते प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने यांनी पुढाकार घेत सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधली आहे.
तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कार्यपद्धतीबाबत सर्वसामान्य नागरिकांपासून राजकीय पदाधिकाऱ्यांपर्यंत नाराजी आहे. तहसील मध्ये कामे घेऊन आलेल्या नागरिकांना अपमानास्पद वागणूक देणे, सामान्य जनतेला वेठीस धरणे आणि तालुक्याचे आपणच सर्वेसर्वा असल्याप्रमाणे वागणे,असे गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहेत. त्यांच्या विरोधात यापूर्वीही विविध स्तरांवर तक्रारी करण्यात आल्याची माहिती आहे.
इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याबाबत वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बारामतीचे प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून या प्रकरणाची दखल घेतली गेल्याची माहिती सूत्रांनी “बातमी चे बोला’ ला दिली आहे.
दरम्यान, २५ तारखेला होणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चापूर्वीच तहसीलदार जीवन बनसोडे यांची बदली अथवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याबाबत वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे मोर्चापूर्वीच त्यांच्या पदाबाबत मोठा निर्णय होणार का, याकडे संपूर्ण इंदापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे पुढील काही महिन्यांत जीवन बनसोडे यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया अपेक्षित असल्याची चर्चा आहे. मात्र त्यापूर्वीच त्यांना इंदापूरमधून बाजूला करण्यासाठी बदली किंवा सक्तीची रजा हा पर्याय पुढे आला असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.
एकीकडे सर्वपक्षीय नेत्यांचा मोर्चा, दुसरीकडे नागरिकांमधून व्यक्त होणारी नाराजी आणि तिसरीकडे महसूल विभागातील संभाव्य प्रशासकीय हालचाली… या सगळ्या पार्श्वभूमीवर जीवन बनसोडे यांची इंदापूरमधून उचलबांगडी होणार हे निश्चित झाले आहे.मात्र,येत्या दोन ते तीन दिवसांत नेमक्या कोणत्या घडामोडी घडतात आणि २५ तारखेच्या मोर्चापूर्वी प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
मात्र एक गोष्ट निश्चित! २५ तारखेचा मोर्चा आणि तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याबाबतचा संभाव्य प्रशासकीय निर्णय यामुळे इंदापूरच्या राजकारणात आणि महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.



