विशेष

mangoor cultivation in Indapur/इंदापूरमध्ये प्रतिबंधित मांगूर संवर्धनावर मोठी कारवाई; ७०० किलो मासा नष्ट.

इंदापूर,दि २१

  • इंदापूर तालुक्यात प्रतिबंधित मांगूर माशांचे संवर्धन करणाऱ्यांविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने मोठी कारवाई केली आहे. कालठण नं. १ येथे १९ ऑगस्ट २०२६ रोजी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, पुणे कार्यालयाच्या पथकाने कारवाई करत तब्बल ७०० किलो प्रतिबंधित मांगूर मासा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट केला. या प्रकरणी संबंधित मांगूर संवर्धक दत्तात्रय झेडगे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कालठण नं. १ परिसरात दत्तात्रय झेडगे यांच्या ताब्यातील तळ्यांमध्ये प्रतिबंधित मांगूर माशांचे संवर्धन केले जात असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाला मिळाली होती. त्यानंतर संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई केली.

या कारवाईदरम्यान तळ्यांमध्ये आढळून आलेला सुमारे ७०० किलो मांगूर मासा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आला. प्रतिबंधित प्रजातीचे संवर्धन केल्याप्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईचे वैशिष्ट्य म्हणजे विविध शासकीय विभागांनी संयुक्तपणे सहभाग घेतला. पाटबंधारे विभाग, महसूल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस प्रशासन तसेच BNHS मुंबई येथील अधिकारी आणि कर्मचारी या कारवाईसाठी उपस्थित होते. त्यामुळे मांगूर संवर्धनाच्या प्रश्नावर प्रशासनाने समन्वयाने कारवाई केल्याचे दिसून आले.

विशेष म्हणजे, मत्स्य आयुक्त अर्चना शिंदे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती मत्स्यव्यवसाय विभागाकडून देण्यात आली आहे. प्रतिबंधित मांगूर माशांच्या संवर्धनामुळे पर्यावरणीय समतोलावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने अशा प्रकारच्या संवर्धनाविरोधात प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे.

इंदापूर तालुक्यातील कालठण नं. १ येथे झालेल्या या कारवाईमुळे प्रतिबंधित मांगूर पालन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. येत्या काळात तालुक्यात अशा प्रकारचे अवैध किंवा प्रतिबंधित मत्स्यसंवर्धन आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे मत्स्य आयुक्त अर्चना शिंदे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!