IMA Indapur/इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. अभिजीत ठोंबरे; सचिवपदी डॉ. अतुल वनवे यांची निवड
इंदापूर,दि २
- इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) इंदापूर तालुक्याच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. यामध्ये डॉ.अभिजीत ठोंबरे यांची इंदापूर IMA शाखा अध्यक्षपदी, तर डॉ.अतुल वनवे यांची सचिवपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीचे इंदापूर तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले असून, नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून डॉक्टरांच्या समस्या सोडविणे, वैद्यकीय सेवेची गुणवत्ता वाढविणे आणि समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रमुख अतिथी म्हणून डॉ.सुनील इंगळे, डॉ. अनिल पानसे आणि डॉ.संजय पाटील उपस्थित होते. तसेच आयएमए फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आयएमए महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ.राम आरणकर, इंदापूर IMA चे मावळते अध्यक्ष डॉ अनिल शिर्के, डॉ अविनाश पानबुडे यांनी विशेष उपस्थित राहून नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. इंदापूर शहर व तालुक्यातील मोठ्या संख्येने डॉक्टरांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवत नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्याची माहिती देताना सांगितले की, डॉक्टरांच्या व्यावसायिक समस्या सोडविणे, त्यांच्या हक्कांचे आणि प्रतिष्ठेचे संरक्षण करणे, वैद्यकीय व्यवसायावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणे आणि डॉक्टरांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही आयएमएची प्रमुख उद्दिष्टे आहेत. बदलत्या काळात डॉक्टरांसमोरील विविध प्रशासकीय, कायदेशीर आणि व्यावसायिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संघटितपणे कार्य करणे आवश्यक असून, त्यासाठी आयएमए महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासनासोबत समन्वय साधणे, विविध आरोग्यविषयक जनजागृती मोहिमा राबविणे, संसर्गजन्य तसेच असंसर्गजन्य आजारांविषयी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण भागात आरोग्यविषयक उपक्रम आयोजित करणे यालाही आयएमए प्राधान्य देत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नवीन अध्यक्ष डॉ. अभिजीत ठोंबरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना इंदापूर तालुक्यातील सर्व डॉक्टरांना एकत्रित घेऊन संघटना अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. डॉक्टरांच्या समस्या प्राधान्याने सोडविणे, वैद्यकीय व्यवसायाची प्रतिष्ठा अबाधित ठेवणे, समाजोपयोगी आरोग्य उपक्रम, मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, जनजागृती मोहिमा आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित विविध विधायक कार्यक्रम सातत्याने राबविण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या शेवटी नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवर, डॉक्टर आणि सदस्यांनी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा देत इंदापूर तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी, दर्जेदार आणि लोकाभिमुख करण्यासाठी आयएमएच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य घडेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी लहान मुलांनी केलेली पालखी सोहळ्यातील विठ्ठल रुक्मिणीची थीम मध्ये प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले.



