इंदापूर मध्ये पार पडलेल्या “इंदाकॉन २०२५’ चर्चासत्रात जगभरातून ४ हजार डॉक्टरांची उपस्थिती.
जगात इंदापूर पॅटर्न म्हणून कार्यशाळेची नोंद.

इंदापूर,दि.२०
- “इंदापूर येथील इंदाकॉन २०२५’ या तीनदिवसीय चर्चासत्रात ४० डॉक्टरांनी विविध विषयावर सादरीकरण केलेल्या कार्यशाळेत यू ट्यूबसह चार हजार डॉक्टरांनी सहभाग नोंदविल्याने हा एक विक्रम झाला. यामुळे इंदापूर आयएमए च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या कार्यशाळेत डॉक्टरांचे ज्ञान अद्ययावत झाल्याने त्याचा फायदा डॉक्टरांना वैद्यकीय व्यवसाय करताना निश्चित होणार आहे.
इंदापूर इंडियन मेडिकल असोसिएशन, जिल्हा पुणे शाखेच्या वतीने इंदापूर आयएमए च्या डॉ. नि. तू. मांडके सभागृहात ही राज्य स्तरीय वैद्यकीय तीन दिवसीय परिषद नुकतीच संपन्न झाली. कार्यशाळेच्या शुभारंभ प्रसंगी अकलूज येथील डॉ. अनिकेत इनामदार यांनी अती गंभीर रुग्णांमध्ये कार्डिओ पल्मोनरी रिसससिटेशन व कोल्हापूर येथील डॉ. सचिन फिरके यांची एव्हरेस्ट बेस कॅम्प माहिती कार्यशाळा संपन्न झाली. त्यानंतर विविध विषया वर ४० तज्ञ डॉक्टरांनी वैद्यकीय सादरीकरण केले.
कार्यशाळेत यू ट्यूब ब्रॉडकास्ट वर जगभरातून ४ हजार डॉक्टरांनी उपस्थिती नोंदविल्याने या कार्यशाळेचा इंदापूर पॅटर्न संपूर्ण जगभरात झाला. या कार्यशाळेत स्वर्गीय गोकुळदास शहा स्मृती ओरेशन,चंदुकाका सराफ ओरेशन, डॉ. नी. तू मांडके ओरेशन, स्व. पद्मश्री डॉ. मनोहर डोळे ओरेशन स्व. डॉ. आर. डी. लेले ओरेशन ही पाच चर्चासत्रे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या कार्यशाळेत मिडिया, पोलीस व वैद्यकीय व्यवसाय या विषयावर पॅनल चर्चासत्र आयएमए महाराष्ट्र प्रदेश इलेक्ट प्रेसिडेंट डॉ. संतोष कुलकर्णी, महाराष्ट्र आयएमए कॅन्झूम डिस्पुट कमिशनचे माजी सदस्य डॉ. संतोष काकडे, फॉर्मर एसपीआयडीजी डॉ.अतुलचंद्र कुलकर्णी, राज्याचे आरोग्य सेवा संचालक डॉ. स्वप्नील लाळे, जेष्ठ पत्रकार सारंग दर्शने, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व पत्रकारांच्या उपस्थितीत संपन्न झाले. हे चर्चासत्र कार्यशाळे च्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.
डॉ. अलका मांडके व डॉ. उमा प्रधान यांच्या विशेष उपस्थितीत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. इंदापूर इंदाकॉन २०२५ च्या सर्व कमिटी मेंबर्सला उत्कृष्ट नियोजन तसेच कार्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
इंदापूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल शिर्के यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. परिषद समितीचे चेअरमन डॉ. अविनाश पाणबुडे यांनी इंदापूर इंदाकॉन २०२५ चे महत्व विशद केले. इंदापूर आयएमए चे सचिव डॉ. सुधीर तांबिले यांनी आभार प्रदर्शन केले.
आयएमए माजी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. राम अरणकर व डॉ. अशोक तांबे, डॉ. कुटे व सर्वच मान्यवरांनी इंदापूर सारख्या निमशहरी भागात तीन दिवसीय परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल इंदापूर आयएमए संयोजक व नियोजन समितीचे कौतुक केले. यावेळी डॉ. एम. के. इनामदार, डॉ. श्रेणिक शहा, डॉ. अभिजित ठोंबरे, डॉ. निखिल धापटे यांच्या सह पुणे, सोलापूर, नगर, सातारा तसेच इतर जिल्ह्यातील डॉक्टर्स उपस्थित होते.