विशेष

उभी पिके करपली, शेतकरी हवालदिल; लाखेवाडीत भीषण वास्तव.

लाखेवाडीत पाणीटंचाईचा कहर.

इंदापूर,दि.१७

  • इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी परिसरात सध्या हृदय पिळवटून टाकणारे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी जीवाचे रान करून उभी केलेली पिके आज पाण्याविना करपत आहेत. हिरवागार शिवार अक्षरशः पिवळा पडू लागला असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या कष्टांची राख होत आहे.

एकीकडे प्रचंड वाढलेले तापमान, दुसरीकडे अनेक महिन्यांपासून पाण्याचे आवर्तन बंद… त्यात वेळेवर वीजपुरवठा नसल्याने विहिरी, बोअरवेल आणि मोटारी निष्प्रभ ठरत आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी इतकी खालावली आहे की, शेतकऱ्यांच्या हातात आता फक्त हतबलता उरली आहे.

ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून आणि रात्रंदिवस राबून पिके उभी केली, त्याच पिकांकडे आता ते अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पाहत आहेत. “पाणी असते तर पीक वाचले असते…” हे शब्द उच्चारतानाच अनेक शेतकऱ्यांचा कंठ दाटून येत आहे.

इंदापूर तालुक्यातील शेतकरी आज अक्षरशः दुहेरी संकटात सापडला आहे. कधी अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ, कधी बाजारभावाचा खेळ… आणि आता पाण्याअभावी जळणारी शेती. शेतकऱ्यांच्या जिवावर चाललेल्या या व्यवस्थेकडे शासन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष संतापजनक असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

“शेतकरी जगला तरच देश जगेल” अशा घोषणा फक्त भाषणातच राहिल्या आहेत का? असा सवाल आता लाखेवाडीतील शेतकरी विचारू लागला आहे. कारण, ज्या हातांनी देशासाठी अन्न पिकवले, त्याच हातांमध्ये आज निराशा आणि हताशपणा दिसत आहे.वेळेवर पाणी नाही, नियमित लाईट नाही, पिकाला भाव नाही… मग शेतकऱ्याने जगायचे तरी कसे? हा प्रश्न आता लाखेवाडी परिसरातून थेट शासनाला विचारला जात आहे.

दरम्यान, जळून खाक होऊ लागलेल्या पिकांचे शासनाने तात्काळ पंचनामे करावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच त्वरित पाण्याचे आवर्तन सुरू करून नियमित वीजपुरवठा करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा उद्या जळणारी ही शेतीच नव्हे, तर शेतकऱ्यांची स्वप्नेही राख होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!