उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इंदापूर दौऱ्यावर;संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाची करणार पाहणी.

इंदापूर,दि १४
- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उद्या इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असून संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. या दौऱ्यामुळे तालुक्यातील राजकीय व प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत इंदापूर तालुक्यात सुरू असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामाची पाहणी करण्याची विनंती केली होती. पालखी महामार्गाच्या कामांबाबत स्थानिक नागरिकांकडून विविध समस्या आणि सूचना समोर येत असल्याने प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या विनंतीची दखल घेत गडकरी आता प्रत्यक्ष इंदापूर दौऱ्यावर येत असल्याचे मानले जात आहे.
संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग हा वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. दरवर्षी लाखो वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होत असल्याने या मार्गाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि वाहतुकीची सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरते. सध्या सुरू असलेल्या कामांमध्ये काही ठिकाणी रस्त्याची रुंदी, सर्व्हिस रोड, पावसाळ्यातील अडचणी तसेच स्थानिकांच्या मागण्या याबाबत चर्चा सुरू आहे.
गडकरींचा ‘नितीन’ मार्ग..!
देशभरात इंधन बचत आणि खर्च कपातीचा संदेश दिला जात असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतःच कृतीतून आदर्श घालून देणार आहेत. पुणे–सोलापूर दौऱ्यासाठी व्हीआयपी ताफा आणि आलिशान गाड्या बाजूला ठेवत गडकरी बसने प्रवास करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे इंधन बचतीसोबतच साधेपणा, पर्यावरण संवर्धन आणि प्रशासनातील अनावश्यक खर्च कमी करण्याचा ठोस संदेश दिला जाणार आहे.
गडकरी यांच्या दौऱ्यात संबंधित अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रतिनिधी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. महामार्गाच्या कामांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रश्न आणि भविष्यातील नियोजन याबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, गडकरी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारीला वेग आला असून सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता आणि रस्ते दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत. या दौऱ्यात पालखी महामार्गासंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने संपूर्ण इंदापूर तालुक्याचे लक्ष या दौऱ्याकडे लागले आहे.



