इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी गावात धक्कादायक प्रकार; हर घर जल योजनेचे पाणी गाव पुढाऱ्याच्या शेतात ?
बोराटवाडीत सरकारी पाण्यावर राजकीय कब्जा?

इंदापूर,दि १७
- इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी येथे केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी “हर घर जल” योजनेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याची चर्चा गावात जोर धरू लागली आहे. गावकऱ्यांच्या घरात पाणी पोहोचवण्यासाठी शासनाने लाखो रुपयांचा निधी खर्च करून विहीर खोदली, मात्र त्या विहिरीचे पाणी गावातील तहानलेल्या नागरिकांच्या नळात न जाता थेट एका गाव पुढाऱ्याच्या शेतात पोहोचल्याचा गंभीर आरोप आता गावकऱ्यांकडून होत आहे.
नीरा नदीच्या कुशीत वसलेल्या बोराटवाडी गावात शासनाने “हर घर जल” योजनेअंतर्गत मोठ्या गाजावाजात कामे सुरू केली होती. प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचवण्याचे स्वप्न दाखवण्यात आले. ग्रामस्थांना पाण्यासाठी होणारी वणवण थांबेल, महिलांच्या डोक्यावरचे हंडे उतरतील, अशी आश्वासने देण्यात आली.
मात्र प्रत्यक्षात योजना नागरिकांसाठी कमी आणि काही मोजक्या प्रभावशाली लोकांच्या फायद्यासाठीच राबवली गेली का, असा संतप्त सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. गावामध्ये शासनाच्या पैशातून खोदलेली विहीर ही सार्वजनिक वापरासाठी असताना तिचे पाणी जर खासगी शेतासाठी वापरले जात असेल, तर हा प्रकार म्हणजे शासनाच्या पैशावर सरळसरळ दरोडा नसून काय? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
विशेष म्हणजे गावातील अनेक भागात अजूनही नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्याची तक्रार आहे. काही ठिकाणी नळयोजना केवळ कागदावर असल्याचे बोलले जात आहे. अशावेळी सरकारी योजनेचे पाणी जर गाव पुढाऱ्याच्या शेतातच वळवले जात असेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा? असा संतप्त सूर ग्रामस्थांमधून उमटत आहे.
बोराटवाडीतील या कथित प्रकारामुळे संपूर्ण इंदापूर तालुक्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
या संपूर्ण प्रकरणात संबंधित ठेकेदार, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि पाणीपुरवठा विभागातील अधिकारी यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कामाची पाहणी करणारे अधिकारी नेमके काय करत होते? विहिरीचे पाणी कुठे आणि कशासाठी वापरले जात आहे याची माहिती प्रशासनाला नव्हती का? की सर्व काही माहित असूनही जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले? अशी चर्चा आता गावपातळीवर रंगू लागली आहे.
- जर या प्रकरणातील आरोप खरे असतील, तर संबंधित गाव पुढाऱ्यावर गुन्हा दाखल होणार का? शासनाचा निधी वाया घालवणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले जाणार का? संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणार का? असे एक ना अनेक प्रश्न आता गावकरी विचारू लागले आहेत.
“हर घर जल” ही योजना ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनातील तहान संपवण्यासाठी होती की राजकीय पुढाऱ्यांच्या शेताला मोफत पाणीपुरवठा करण्यासाठी? असा धारदार सवाल आता इंदापूर तालुक्यातून उपस्थित होत आहे.



