इंदापूर विधानसभेच्या उमेदवाराबाबत निवडून येण्याची क्षमता हाच निकष; तडजोड होणार नाही :- खा.शरद पवार.
अपष्टपणे हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देण्याचे संकेत.?
इंदापूर,दि.२९
- गेली अनेक दिवस इंदापूर विधानसभा मतदारसंघ संपूर्ण राज्यांमध्ये चर्चेत आला आहे. त्यातच आज इंदापूर विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे कार्यकर्ते व विधानसभेसाठी इच्छुक असलेले नेते थेट शरद पवार यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर शरद पवार यांनी इंदापूर विधानसभेसाठी निवडून येण्याची क्षमता असणाऱ्याला उमेदवारी दिली जाईल त्यामध्ये तडजोड केली जाणार नाही असे जाहीर करत अपष्टपणे हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत.
इंदापूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटातील तब्बल ६ लोकांनी विधानसभेसाठी इच्छुक म्हणून पक्षाकडे अर्ज केले आहेत. त्या सर्व इच्छुकांनी आज शरद पवार यांच्या बारामती मधील शारदानगर येथील गोविंद बाग या निवासस्थानी पक्षासाठी काम केलेल्यांपैकी एकाला संधी द्या अशी मागणी करत प्रत्येकाने आपण पक्षासाठी काय केले हा लेखाजोखा शरद पवार यांच्यासमोर मांडत उमेदवारी देण्याची मागणी केली.
त्यानंतर खा.शरद पवार उपस्थित इच्छुकांना व कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की बारामती लोकसभेच्या निवडणुकीत अनेकांनी पक्षाचे काम चांगल्या पद्धतीने केल्याने पक्षाने त्या ठिकाणी चांगल्या मताधिक्याने विजय संपादित केला. त्यामुळे इंदापूर विधानसभेसाठी अनेकांनी उमेदवारी पक्षाकडे मागितली आहे. परंतु इंदापूर विधानसभेसाठी निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवाराला संधी दिली जाईल. त्यामध्ये तडजोड केली जाणार नाही म्हणत हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांच्याकडे एक लाखापेक्षा अधिक मतदार असून गावोगावी स्वतःची सक्षम यंत्रणा आहे. तसेच हर्षवर्धन पाटील व शरद पवार यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यातच आज शरद पवार यांनी केलेले विधान आणि सांगितलेले निकष हर्षवर्धन पाटील यांना लागू होतात. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हेच शरद पवार गटाचे इंदापूर विधानसभेसाठी उमेदवार असल्याचे निश्चित मानले जातआहे.