स्वराज प्रतिष्ठानतर्फे सह्याद्री देवराई संस्थेला १०१ फळझाडांची भेट; पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला बळ.

इंदापूर, दि.१६
- निसर्ग संवर्धन, वृक्षलागवड आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी राज्यभर उल्लेखनीय कार्य करणारे सुप्रसिद्ध सिनेअभिनेते तथा सह्याद्री देवराई संस्थेचे संस्थापक यांनी नुकतीच इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे भेट दिली. त्यांच्या या भेटीदरम्यान पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या स्वराज प्रतिष्ठानतर्फे सह्याद्री देवराई संस्थेला १०१ फळझाडांच्या रोपांची भेट देण्यात आली.
बेलवाडी येथील दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाचे माजी चेअरमन शहाजी शिंदे यांच्या चंदन लागवड प्रकल्पाची पाहणी सयाजीराव शिंदे यांनी केली. ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडून राबविण्यात येत असलेल्या वृक्षसंवर्धन आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी स्वराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वप्निल सावंत यांच्या हस्ते सह्याद्री देवराई संस्थेस १०१ फळझाडांच्या रोपांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. संतोष होगले, डॉ. सागर गांधी तसेच पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
सह्याद्री देवराई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिनेते सयाजी शिंदे हे महाराष्ट्रासह देशभरात वृक्षलागवड, बीजसंकलन, जलसंवर्धन आणि जैवविविधता संरक्षणासाठी कार्यरत आहे.पारंपरिक देवराई म्हणजे गावाच्या हद्दीतील संरक्षित जंगलाचा भाग. या देवराया केवळ वृक्षांचे समूह नसून त्या स्थानिक जैवविविधतेचे आश्रयस्थान आहेत. अनेक दुर्मिळ वनस्पती, पक्षी, प्राणी आणि सूक्ष्मजीवांचे संवर्धन या देवराई मुळे होत असते.
सयाजीराव शिंदे यांच्या पुढाकारातून सह्याद्री देवराई संस्थेने लाखो वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला आहे. वाढते तापमान, घटते जंगल क्षेत्र आणि बदलते हवामान यांचा सामना करण्यासाठी वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
- स्वराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वप्निल सावंत यांनी पालखी महामार्गावरील झाडांच्या पुनर्लागवडीसाठी (रिप्लांटेशन) करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती सयाजीराव शिंदे यांना दिली. विकासकामांसाठी स्थलांतरित करावी लागणारी झाडे वाचविण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. तसेच पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात युवकांनी पुढाकार घेऊन सह्याद्री देवराई संस्थेसोबत काम करावे, असे आवाहनही करण्यात आले.
या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडून आला असून, भविष्यात अशा उपक्रमांमधून अधिकाधिक वृक्षलागवड व निसर्गसंवर्धनाचे कार्य उभे राहील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.



