पुणे ग्रामीण LCB चा सापळा यशस्वी;१२ वर्षांपासून फरार आरोपी पकडला.

इंदापूर, दि.१७
- पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या विशेष कारवाईत तब्बल १२ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस अटक करण्यात यश मिळवले आहे. भिगवण परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला रेकॉर्डवरील फरार व पाहिजे आरोपींविरुद्ध विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक माहिती संकलन व शोधमोहीम राबवत होते.
यावेळी चिवड्या उर्फ चिवळ्या पानफुल्या भोसले (रा. टाकळी, ता. करमाळा, जि. सोलापूर) हा आरोपी भिगवण-मदनवाडी चौक परिसरात येणार असल्याची खात्रीलायक माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३/२१४ मधील भारतीय दंड संहिता कलम ३९५ अन्वये नोंद असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात गेली १२ वर्षे फरार असल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यास अटक करून पुढील कारवाईसाठी दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक कारंडे, सहायक पोलीस फौजदार शिवाजी निकम, पोलीस हवालदार अजय घुले, किशोर तेलंग, गुलाब पाटील, स्वप्निल अहिवळे, सुलतान डांगे, शैलेश स्वामी तसेच पोलीस अमलदार रहिस मुलाणी, गणेश डेरे आणि तुषार चव्हाण यांनी सहभाग घेतला.



