
इंदापूर,दि २२
- इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात मानवतेला काळीमा फासणारा संतापजनक प्रकार समोर येत असल्याची चर्चा सुरू आहे. बाभुळगावसह आसपासच्या गावांमध्ये बाहेरगावाहून व परराज्यातून भटकत आलेल्या मनोरुग्ण व्यक्तींना शेतामध्ये नेऊन त्यांच्याकडून अमानुष पद्धतीने काम करून घेतले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून भटकंती करत जाणाऱ्या अनेक मनोरुग्णांना काही स्थानिक शेतकरी आपल्या ताब्यात घेत असल्याचा आरोप आहे. डोक्यावर परिणाम झाल्याने स्वतःचे गाव, घर किंवा कुटुंबाची माहिती सांगू न शकणाऱ्या या व्यक्तींना केवळ दोन वेळचे अन्न देऊन दिवसभर जनावरांसारखी कष्टाची कामे करून घेतली जात असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे या मनोरुग्णांना मराठी भाषाही बोलता येत नसल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण बनले आहे. याचाच गैरफायदा घेत काहीजण त्यांना शेतात ठेवून ऊसतोड, जनावरांची देखभाल व शेण-घाण काढणे, शेतीतील मेहनतीची कामे, कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्म वरती कामे करून घेत असल्याची खात्रीशीर सूत्रांकडून माहिती मिळत आहे.
काम करण्यास नकार दिल्यास संबंधित मनोरुग्ण व्यक्तीला मारहाण केली जाते, धमकावले जाते आणि जबरदस्तीने राबवले जात असल्याचाही गंभीर आरोप स्थानिक पातळीवरून होत आहे. अनेक मनोरुग्णांची अवस्था अत्यंत दयनीय असून त्यांना वेळेवर अन्न, औषधे किंवा उपचारही मिळत नाही,तसेच त्यांच्या डोक्याची केस वाढली असून त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती समोर येत आहे.
- बाभुळगाव परिसरातील काही शेतांमध्ये अशा अनेक मनोरुग्णांना ठेवण्यात आल्याची चर्चा असून प्रशासनाने याची तात्काळ गंभीर दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. संबंधित मनोरुग्णांची ओळख पटवून त्यांची सुटका करावी, त्यांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवावे किंवा शासनमान्य आश्रम, पुनर्वसन केंद्रात दाखल करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
मानवतेला काळीमा फासणाऱ्या या प्रकाराची प्रशासनाने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.



