संपादकीय

अरे त्या ट्रम्प तात्याला कोणीतरी थांबवा… नाहीतर आपलं लय अवघड होईल!

संपादकीय/ जितेंद्र जाधव 

जगात कुठे काय होतंय हे सामान्य माणसाला कळायच्या आत पेट्रोलचा दर वाढतो आणि गॅसच्या रांगा लांब होतात. मग गावातल्या चौकात चर्चा सुरू होते – “काय झालंय रे?” तर उत्तर येतं, “अहो अमेरिका-इराण-इज्राईल काहीतरी सुरू आहे म्हणे…!

जगात सध्या अमेरिका, इज्राइल विरुद्ध इराण यांच्यातील तणावामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, जगातील मोठे देश युद्धाची भाषा बोलत आहेत… आणि छोट्या माणसाच्या घरात मात्र गॅस संपण्याची भीती निर्माण झाली आहे.

जगातील मोठे नेते नकाशावर बोट ठेवून रणनीती आखत आहेत, तर भारतात लोक गॅस सिलेंडरवर हात ठेवून विचारत आहेत –
“भाऊ, अजून किती दिवस पुरणार?”
१४० कोटी लोकसंख्या असलेल्या India मध्ये सध्या चर्चा दोनच गोष्टींची सुरू आहे –
एक म्हणजे जगात युद्ध कधी थांबणार…
आणि दुसरी म्हणजे गॅस सिलेंडर कधी मिळणार!

आंतरराष्ट्रीय बाजारात तेल-गॅसचे दर वाढल्यामुळे पेट्रोल पंपवाल्यांचे चेहरे गंभीर झाले आहेत, तर गॅस एजन्सीसमोर लोकांची छोटी-मोठी “लोकसभा” भरू लागली आहे. कुणी म्हणतं, “माझा नंबर आधी होता”… तर कुणी म्हणतं, “मी कालपासून रांगेत आहे!

दरम्यान काही जणांनी तर जुने स्टोव्ह, शेगड्या, लाकूड-फाटा काढून ठेवायला सुरुवात केली आहे. कारण लोक म्हणतायत –
“जगात मिसाईल उडतायत, पण आपल्या घरात पोळी कशी होणार याचाच मोठा प्रश्न आहे

आता जगाच्या नकाशावर कुठे इराण, कुठे अमेरिका आणि कुठे इज्राईल… पण परिणाम मात्र सरळ आपल्या घरच्या सिलेंडरवर! त्यामुळे गावातले काका म्हणतात, “अरे त्या ट्रम्प तात्याला थांबवा नाहीतर आपलं लय अवघड होईल.

कारण काय… युद्ध तिकडे सुरू होतं आणि महागाई इकडे वाढते. पेट्रोल पंपावर रांगा, गॅस एजन्सीवर नंबर, आणि सोशल मीडियावर तज्ज्ञांची भरमार. कुणी म्हणतं तेल बंद होणार, कुणी म्हणतं तिसरं महायुद्ध येणार!

मात्र भारतात साध्या माणसांना एकच प्रश्न – “आपला गॅस सिलेंडर वेळेवर मिळणार का?”

जगातील मोठे देश युद्धाची रणनीती आखत असतात, मिसाईल्सची चाचणी करत असतात, तर दुसरीकडे आपला भारतीय नागरिक कॅल्क्युलेटर काढून घरचा खर्च मोजत असतो. कारण पेट्रोल ५ रुपये वाढलं की बजेटचा घोळ होतो.

आता जर अमेरिका-इराण-इज्राईल यांचं भांडण खरंच वाढलं, तर इंधनाचा तुटवडा, महागाई आणि आर्थिक संकट यांची साखळी तयार होईल. आणि मग गावातल्या चहाच्या टपरीवर बसलेला पांडुरंग म्हणेल, “आपल्याला काय… मोठे लोक भांडतात आणि त्रास आपल्यालाच!”

म्हणूनच लोकांची साधी अपेक्षा आहे – जगातील नेत्यांनी थोडं शांत बसावं. कारण युद्ध जिंकलं की नाही हे नंतर ठरेल, पण महागाई मात्र लगेच जिंकते!

तेव्हा जगात कुठेही युद्ध पेटलं की गावातील सामान्य माणसाचं एकच वाक्य तयार असतं –
“अरे त्या ट्रम्प तात्याला कोणीतरी थांबवा… नाहीतर आपलं लय अवघड होईल!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!