महाराष्ट्र
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार;आज तारीख जाहीर होणार.
निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद.

मुंबई,दि.१५
- अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद आहे. दुपारी 3.30 मिनिटांनी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ही पत्रकार परिषद सुरू होईल.
या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रसह झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. ‘एएनआय’ने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. निवडणूक यंत्रणेची तयारीही अंतिम टप्प्यात पोहचली आहे. आज दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार असून यात निवडणुकीची घोषणा केली जाईल. त्यामुळे सर्वांच्या नजरा दिल्लीकडे लागल्या आहेत.
राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची सुरू असलेली धावळ लक्षात घेता आज निवडणुकीच्या तारखांची घोषणा होईल अशी चर्चा होती. ही चर्चा खरी ठरली असून आज दुपारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकांची घोषणा होताच त्या क्षणापासून राज्यात आचारसंहिता लागू होईल.