
इंदापूर, दि.५
- उजनी धरणातील पाणीपातळीत दिवसेंदिवस झपाट्याने घट होत असून, धरणातील एकूण पाणीसाठा सध्या ८७.६८ टक्के असला तरी उपयुक्त पाणीसाठा ५० टक्क्यांच्या खाली आला आहे. सध्या उजनीमध्ये केवळ ४६.९७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याने आगामी काळात पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
उजनी धरणातून सध्या विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून २१० क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन योजनेतून ११० क्युसेक्स, बोगद्यातून ६०० क्युसेक्स, तर कॅनलमधून २६५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने धरणातील पाणीसाठ्यावर त्याचा परिणाम होत आहे.
यंदाच्या पावसाळ्यात उजनीच्या थेट पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस झाला नाही. पुणे आणि पुण्याच्या घाटमाथ्यावरील भागात झालेल्या पावसामुळे उजनीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आणि धरणाची पाणीपातळी समाधानकारक झाली. मात्र, धरण शंभर टक्के भरण्यापूर्वीच काही प्रमाणात पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. त्यानंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरू शकले नाही.
सध्या धरणातील एकूण साठा समाधानकारक दिसत असला तरी उपयुक्त पाणीसाठा ५० टक्क्यांच्या खाली गेल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. पाणीपातळीतील हीच घट कायम राहिल्यास आगामी उन्हाळ्यात उजनीवर अवलंबून असलेल्या शेती, पिण्याच्या पाणी योजना आणि विविध प्रकल्पांसमोर मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाने उजनीतील पाणी प्रामुख्याने पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र उजनीवर अवलंबून असलेल्या अनेक पाणी योजना, औद्योगिक प्रकल्प आणि शेतीसाठी पाण्याची गरज कायम आहे. पाण्याअभावी काही प्रकल्पांच्या कामकाजावर परिणाम झाल्यास त्याचा थेट परिणाम रोजगारावरही होऊ शकतो.
उजनी धरणावर पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील अनेक भाग अवलंबून आहेत. त्यामुळे यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत उजनी धरण हे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता, आतापासूनच उजनीच्या पाण्याचे काटकसरीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने वाटप करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
उजनी धरणासाठी आपल्या जमिनी देणाऱ्या धरणग्रस्त आणि उजनीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दुष्काळाच्या काळात उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून शेती वाचविण्याला प्राधान्य दिल्यास भाजीपाला आणि अन्य पिकांचे उत्पादन सुरू राहू शकते. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत अन्नधान्य व भाजीपाल्याची उपलब्धता कायम ठेवण्यासही मदत होणार आहे.
दरम्यान, सध्या सुरू असलेला पाण्याचा विसर्ग आणि आगामी काळातील पाण्याची गरज लक्षात घेता उजनी यंदा तळ गाठणार का? हा प्रश्न शेतकरी आणि उजनीवर अवलंबून असलेल्या नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने आतापासूनच पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करण्याची गरज आहे.



