
इंदापूर,दि २९
- उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या AI डेटा सेंटर, तरंगता सौरऊर्जा प्रकल्प आणि हरित हायड्रोजन प्रकल्पांमुळे उजनीच्या जलसाठ्यावर, जलचर परिसंस्थेवर, शेतीवर आणि स्थानिक पर्यावरणावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मोठ्या प्रमाणातील औद्योगिक प्रकल्पांमुळे पाण्याचा वापर वाढल्यास उजनीच्या उपलब्ध जलसाठ्यावर अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एआय डेटा सेंटरमध्ये मोठ्या संख्येने सर्व्हर्स कार्यरत असतात. या सर्व्हर्सच्या शीतकरणासाठी प्रकल्पाच्या तंत्रज्ञानानुसार मोठ्या प्रमाणात पाणी आणि वीज आवश्यक असू शकते. त्यामुळे या प्रकल्पासाठी नेमके किती पाणी लागणार, पाण्याचा स्रोत कोणता असणार आणि वापरानंतरच्या पाण्याची विल्हेवाट कशी लावली जाणार, याबाबत स्पष्ट पर्यावरणीय अभ्यास होणे आवश्यक आहे.
उजनी धरणावर मोठ्या प्रमाणात शेती आणि विविध जलवापर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत औद्योगिक पाणीवापर वाढल्यास त्याचा परिणाम पाण्याच्या उपलब्धतेवर तसेच परिसरातील भूजलपातळीवर होऊ शकतो. त्याचा थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम शेती आणि शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे.
उजनी जलाशय हा विविध प्रकारच्या जलचर आणि पक्ष्यांसाठी महत्त्वाचा अधिवास आहे. प्रकल्पातून उष्ण पाणी किंवा प्रक्रिया केलेले सांडपाणी जलाशयात सोडले गेले, तर पाण्याचे तापमान, पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण आणि पाण्याची गुणवत्ता यामध्ये बदल होण्याची शक्यता असते. अशा बदलांचा परिणाम मासे, सूक्ष्मजीव, जलवनस्पती आणि त्यावर अवलंबून असलेल्या इतर सजीवांवर होऊ शकतो.
तरंगता सौरऊर्जा प्रकल्प मोठ्या क्षेत्रावर उभारला जाणार असल्यास पाण्याच्या पृष्ठभागावर पडणारा सूर्यप्रकाश, पाण्याचे तापमान, जलवनस्पतींची वाढ आणि जलचरांचा अधिवास यावर होणारे संभाव्य परिणामही तपासणे गरजेचे आहे.त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर जमीन प्रकल्पांसाठी वापरली गेल्यास स्थानिक शेती, भूजल पुनर्भरण आणि जमिनीच्या वापरातील बदल यांचाही अभ्यास आवश्यक आहे.
दरम्यान, एआय डेटा सेंटरमधून निघणाऱ्या ‘रेडिएशन’मुळे निश्चितपणे विविध आजार उद्भवतील किंवा शेती नापीक होईल. तसेच अशा मोठ्या प्रकल्पामुळे निर्माण होणारे विद्युतचुंबकीय क्षेत्र, उष्णता, आवाज, पाण्याचा वापर, सांडपाणी आणि ऊर्जा वापर याबाबत लागू असलेल्या पर्यावरणीय व सुरक्षा निकषांचे काटेकोर पालन होणार नाही.
उजनीची परिसंस्था ही केवळ पाण्यापुरती मर्यादित नसून त्यावर मासे, जलवनस्पती, पक्षी, शेती आणि मानवी जीवनाची साखळी अवलंबून आहे. त्यामुळे प्रस्तावित प्रकल्पांचा एकत्रित आणि दीर्घकालीन पर्यावरणीय परिणाम तपासल्याशिवाय कोणताही निर्णय घेतल्यास भविष्यात उजनीच्या जलसंपदा आणि जैवविविधतेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उजनी जलाशयाची पाणीधारण क्षमता, प्रकल्पांची वास्तविक पाण्याची गरज, सांडपाणी व्यवस्थापन, जलचरांवरील परिणाम, शेतीवरील परिणाम आणि जैवविविधतेवरील संभाव्य परिणाम यांचा स्वतंत्र तज्ज्ञांकडून सखोल अभ्यास होणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.



