आरोग्य

लाखेवाडीत मोफत आरोग्य शिबिर यशस्वी; शेकडो ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग.

इंदापूर,दि १२

  • इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ या अभियानांतर्गत आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्यवर्धिनी उपकेंद्र लाखेवाडी व ग्रामपंचायत लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या शिबिरात शेकडो रुग्णांची मोफत तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते श्रीमंत ढोले यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. चित्रलेखा ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी बोलताना जिल्हा परिषद सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते श्रीमंत ढोले यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना गावपातळीवरच दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. आर्थिक अडचणीमुळे महागड्या तपासण्या न करू शकणाऱ्या नागरिकांसाठी अशी शिबिरे उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

लाखेवाडी गावच्या सरपंच सौ.चित्रलेखा ढोले यांनी आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करत नियमित तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले. स्वच्छता, संतुलित आहार व व्यायाम यांचा अवलंब केल्यास निरोगी जीवन शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

शिबिरात रक्त तपासणी, डोळ्यांची तपासणी, ईसीजी व एक्स-रे यांसारख्या सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार सुचविले तसेच गरजूंना पुढील उपचारांसाठी संदर्भित करण्यात आले.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य विभाग, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत पदाधिकारी व स्थानिक नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. लाखेवाडीतील या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून भविष्यातही अशा शिबिरांचे आयोजन करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!