हॉटेल 96 कट्टाचे चालक नितीन तळेकर यांना गोळ्या घालण्याची धमकी?.
खंडणी प्रकरणातील आरोपीच्या नातेवाईकांकडून धमकी.

इंदापूर ,दि २०
- इंदापूर तालुक्यातील वनगळी येथील हॉटेल 96 कट्टाचे मालक नितीन तळेकर यांना खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या नातेवाईकांकडून थेट गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे इंदापूर तालुक्यातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या आठवड्यात वनगळी येथील एका हॉटेल व्यावसायिकाकडून आम्ही पत्रकार असल्याचे भासवून सतत धमकावत पैसे उकळल्याप्रकरणी दोन व्यक्तींवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींच्या नातेवाईकांकडूनच आता तक्रारदार नितीन तळेकर यांना धमकी दिल्याचे समोर आले आहे.
नितीन तळेकर यांना फोन करून त्यांच्या आई व पत्नीविषयी अश्लील व अपमानास्पद भाषा वापरत, “तुला गोळ्या घालू” अशी थेट धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. या गंभीर प्रकारामुळे तळेकर कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी नितीन तळेकर यांनी आपल्या मूळ गावी, करमाळा तालुक्यातील केम येथे धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. तसेच आरोपींच्या कुटुंबाकडून आपल्याला व कुटुंबाला जीवाचा धोका असल्याचे सांगत धमकी देणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
खंडणीप्रकरणानंतरही आरोपींच्या नातेवाईकांकडून अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असल्याने, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिस प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



