इंदापूर नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये ‘२९८ मतांची जादू’! निवडणूकपूर्व घोळ पुन्हा ऐरणीवर.

इंदापूर,दि.६
- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. जिल्हानिहाय आचारसंहिता लागू होत असतानाच, इंदापूर नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये अनपेक्षित वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
इंदापूर नगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीनुसार एकूण मतदारसंख्या २४,५३१ इतकी होती. मात्र ३१ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या अंतिम यादीनुसार ही संख्या २४,८२९ इतकी नोंदली गेली, म्हणजेच २९८ मतांची वाढ झाल्याचे समोर आले आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही वाढ कुठल्या प्रभागांमध्ये आणि कोणत्या प्रक्रियेने झाली याबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण अद्याप उपलब्ध नाही. या आकड्यांतील फरकामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी मतदार याद्यांमध्ये बाहेरील नावे घालण्यात आल्याचा आरोप केला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता इंदापूर नगरपालिकेतील २९८ मतांची ‘अचानक वाढ’ हा मुद्दा पुन्हा एकदा निवडणूक व्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह उभे करत आहे.
स्थानिक नागरिक व राजकीय कार्यकर्त्यांमध्ये यावर चर्चा रंगली असून काहींनी निवडणूक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.“२९८ मतांची वाढ नेमकी कशी आणि कुठून झाली?”, हा प्रश्न आता निवडणूक आयोगासमोर मोठ्या दबावाने विचारला जात आहे.
या पार्श्वभूमीवर, निवडणूक विभागाने तातडीने स्पष्टीकरण देऊन पारदर्शकता राखणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा, इंदापूर नगरपालिका निवडणूक पुन्हा एकदा मतदार यादीतील घोळाच्या वादात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



