विशेष

तरुण पिढीने स्वर्गीय शंकरराव पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.

श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर विस्तारित इमारतीचे लोकार्पण माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते संपन्न.

इंदापूर,दि.१३

  • कर्मयोगी शंकरराव पाटील यांनी आदर्श पिढी घडविण्याचे काम केले, राज्यातील माथाडी कामगारांसाठी आदर्श सेवा नियमावली तयार करून आर्थिक न्याय मिळवून दिला, तसेच भारतात माथाडी कामगारांसाठी पहिला कायदा त्यांच्या कार्यकाळात लागू झाला असून शेतकऱ्यांसाठी खात्रीशीर खातीपुस्तिका तयार करण्याचे श्रेयही त्यांना जाते त्यामुळे आजच्या तरुण पिढीने स्वर्गीय शंकरराव पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे उद्गार माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी काढले.

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर विस्तारित इमारतीचा लोकार्पण सोहळा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटील यांची आज पुण्यतिथी आहे, स्वर्गीय शंकरराव पाटील यांच्या आशीर्वादाने आज या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे, इंदापूर तालुक्यातील गोरगरीब, मजूर, शेतकरी,छोटे व्यावसायिक यांची मुले या संस्थेत शिकत आहेत, आज १५ हजार विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेत असल्याने समाधान वाटते असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले तत्कालीन काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून स्वर्गीय भाऊ हे बाराव्या आणि तेराव्या लोकसभेत बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९२४ रोजी इंदापूर तालुक्यातील बावडा येथे महाशिवरात्रीच्या दिवशी झाला. त्यामुळे त्यांचे नाव ‘शंकर’ ठेवण्यात आले, आणि पुढे ते ‘भाऊ’ म्हणून राज्यात परिचित झाले.

तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी इंदापूर मतदारसंघातून काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीची उमेदवारी भाऊंना दिली.१९५२ ते १९७८ या कालावधीत सलग २६ वर्षे त्यांनी इंदापूरचे आमदार म्हणून काम पाहिले.

१९८४ मध्ये इंदापूर सहकारी साखर कारखान्याची स्थापना करून हजारो कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर इंदापूर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ,दूधगंगा दूध उत्पादक संघ, निरा भिमा सहकारी साखर कारखाना शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा अशा संस्था निर्माण करून तालुक्यात सहकार शिक्षण यासोबतच हजारो युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुप्रिया आगरखेड यांनी केले, तर आभार संस्थेचे सचिव मनोहर चौधरी यांनी व्यक्त केले. संस्थेचे सर्व पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!