
इंदापूर,दि २४
- महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात २०२९ पासून मोठे बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकारच्या स्तरावर मतदारसंघ पुनर्रचना व लोकसंख्या आधारित जागावाटप आणि महिला आरक्षण या मुद्द्यांवर गंभीर हालचाली सुरू आहेत. या सर्व प्रक्रियेचा थेट परिणाम महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
सध्या महाराष्ट्रात लोकसभाच्या ४८ जागा आहेत. मात्र प्रस्तावित बदलांनुसार या जागांची संख्या वाढून ७२ पर्यंत जाऊ शकते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र विधानसभाच्या २८८ जागा वाढून तब्बल ४३२ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसंख्येच्या वाढीचा विचार करून हा निर्णय घेतला जाणार असल्यामुळे अनेक नवीन मतदारसंघ तयार होऊ शकतात, तसेच काही विद्यमान मतदारसंघांची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे.
या बदलांमध्ये महिला आरक्षण हा एक महत्त्वाचा घटक ठरणार आहे. केंद्र सरकार महिला आरक्षण कायद्यात आवश्यक त्या दुरुस्त्या करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे. यामुळे लोकसभेतील महिलांसाठी राखीव जागांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. अंदाजानुसार सुमारे २७३ जागा महिलांसाठी राखीव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक विद्यमान राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होणार असून, महिला नेतृत्वाला मोठी संधी मिळणार आहे.
जागावाटप आणि मतदारसंघांची पुनर्रचना करताना २०११ च्या जनगणनेचा आधार घेतला जाऊ शकतो. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार प्रतिनिधित्व निश्चित केल्यास शहरी भागांमध्ये जागा वाढण्याची शक्यता आहे, तर काही ग्रामीण भागांतील मतदारसंघांमध्ये बदल होऊ शकतो. यामुळे राज्यातील राजकीय नकाशा मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विविध प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांसोबत बैठका घेतल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, बीजेडी आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, काँग्रेस आणि तृणमूल्य काँग्रेस यांच्यासोबत अद्याप बैठक झालेली नसल्याचे समजते.
केंद्र सरकारचा प्रयत्न आहे की या विधेयकावर सर्वपक्षीय एकमत घडवून आणले जावे, कारण मतदारसंघ पुनर्रचना हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. सर्व राजकीय पक्षांचा सहभाग आणि सहमती आवश्यक असल्याने पुढील काही काळात आणखी चर्चा आणि बैठका होण्याची शक्यता आहे.
एकूणच पाहता, २०२९ पर्यंत महाराष्ट्र राज्यातील राजकारणात मोठे आणि ऐतिहासिक बदल घडण्याची शक्यता आहे. जागावाढ, महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना या तिन्ही घटकांचा परिणाम निवडणुकीच्या समीकरणांवर होणार असून, नव्या राजकीय नेतृत्वाला संधी मिळणार आहे. त्यामुळे येणारे काही वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.



