इंदापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची दमदार कामगिरी..!!
दोन तोळे सोन्याच्या मनी मंगळसूत्र सहित २ लाख रुपये किंमतीचा ऐवज चा अवघ्या एक तासात लावला शोध.

इंदापूर,दि.२९
- दि.२८ रोजी इंदापूर शहरातील बस स्थानकातून एका प्रवासी महिलेच्या पर्स मध्ये असलेला दोन तोळ्याचे मनी मंगळसूत्र व मोबाईल सहित इतर सर्व ऐवज पर्स सहित अज्ञात चोराने चोरून लांब पास केला होता. मात्र सदरची माहिती इंदापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला कळताच तांत्रिक माहिती व सखोल तपासाच्या आधारे अवघ्या एक तासात दोन लाख रुपयाचा ऐवज शोधून संबंधित महिलेला परत केला आहे. या कामगिरीमुळे इंदापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.
इंदापूर बस स्थानकातून मनीषा बंडू बनसोडे व त्यांचे पती बंडू रामभाऊ बनसोडे, रा- पळसदेव (माळेवाडी-१) ता- इंदापूर, जि-पुणे, या वालचंदनगर ला जाणाऱ्या बस मध्ये बसण्यासाठी बस स्थानकात थांबल्या होत्या. त्यावेळी वालचंदनगर ला जाणारी बस लागली होती. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बऱ्यापैकी प्रवासी एसटीने प्रवास करतात त्यामुळे वालचंदनगर ला जाणाऱ्या बस मध्ये चढताना गर्दी असल्याने मनीषा बनसोडे यांनी स्वतः जवळची पर्स थेट गाडीच्या सिटवरती टाकली होती. त्या पर्समध्ये दोन तोळ्याचे सोन्याचे मनी मंगळसूत्र व एक मोबाईल असा दोन लाख रुपयाचा ऐवज होता.
मनीषा बनसोडे या बस मध्ये चढल्यानंतर त्यांना त्यांची पर्स संबंधित सिट वरून गायब झाल्याची निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ घाबरलेल्या अवस्थेत इंदापूर बस स्थानकात असलेल्या पोलीस मदत केंद्रात पोलीस अमलदार सचिन बोंबे यांना माहिती दिली. पोलीस आमलदार सचिन बोंबे यांनी संबंधित माहिती पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी तात्काळ सूत्र हलवत इंदापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले.
इंदापूर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील सहाय्यक फौजदार प्रकाश माने, पोलीस अमलदार गणेश डेरे, तुषार चव्हाण, विशाल चौधरी, सचिन बोंबे, आरिफ सय्यद, विठ्ठल गिरी, ज्योती विभुते यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे चोरी गेलेल्या पर्समधील मोबाईल चे लोकेशन तात्काळ काढले. संबंधित पर्स व त्यामध्ये असलेले साहित्य मोबाईल सहित वालचंदनगरच्या दिशेने जाणे ऐवजी ते अकलूजच्या दिशेने एका बस मध्ये जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ अकलूज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लंगोटे यांना संपर्क साधून संबंधित बस तपासण्याची विनंती केली. तोपर्यंत इंदापूर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक अकलूज मध्ये गेलेल्या बसपर्यंत पोहोचले होते.
संबंधित बस ची तपासणी केली असता प्रवासी बसत असलेल्या सीट खाली अज्ञात चोराने चोरून नेलेली पर्स व त्यामधील साहित्य फेकून दिल्याचे मिळून आले. त्यानंतर संबंधित ज्या महिलेचे साहित्य चोरी गेले होते त्यांच्याशी संपर्क साधून आज्ञा चोराने चोरलेले साहित्य मिळाल्याचे सांगितल्यानंतर त्या महिलेने सुटकेचा निस्वास सोडला. संबंधित महिलेला इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व त्यांच्या टीमने सर्व साहित्य सुपूर्द केले आहे.
इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस माझ्यासाठी देव- मनीषा बनसोडे.
मी आयुष्यभर शेतामध्ये कष्ट व मोलमजुरी करून मिळणाऱ्या पैशातून पाच सहा वर्षानंतर मनी मंगळसूत्र केले होते. ते इंदापूर बस स्थानकातून चोरी गेल्यानंतर मला फार मोठा धक्का बसला होता. मी प्रचंड घाबरून रडत- रडत संबंधित माहिती इंदापूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांना दिली. मात्र इंदापूर पोलिसांनी तात्काळ सूत्र हलवल्याने माझे दोन तोळ्याचे मनी मंगळसूत्र व मोबाईल सहित इतर साहित्य मिळाले आहे. इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हे माझ्यासाठी देव आहेत आणि मी त्यांचे आभार मानते.



