
इंदापूर,दि.५ ( जितेंद्र जाधव)
- उजनी धरणाच्या बॅक वॉटर म्हणजेच फुगवट्याजवळ मौजे शहा (इंदापूर ) या गावात असलेली पिराण टेकडी ही शेकडो प्रजातीच्या परदेशातून आलेल्या पक्षांची गोकुळ नगरी म्हणून ओळखली जाते. त्याच पिराण टेकडीवरती यंदाच्या हंगामात परदेशातून अनेक पक्षांचे आगमन झाले असून या मध्ये रशिया, युरोप सह संपूर्ण जगभरातील शेकडो प्रजातीचे पक्षी प्रजननासाठी दाखल झाले आहेत.त्यामुळे पुणे, सोलापूर,अहिल्यानगर सह राज्यातील पक्षी प्रेमींना पक्षी निरीक्षणासाठी व पर्यटनासाठी आनंदाची पर्वणी निर्माण झाली आहे.
पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर उजनी बॅक वॉटर मध्ये मौजे शहा या गावामध्ये असलेला उजनीचा अथांग जलाशय आणि या जलाशयातून पाणी कमी झाल्यावर पाण्यातून वरती येणारी पिराण टेकडी ही स्थलांतरित पक्ष्यांसाठी स्वर्ग मानली जाते. या टेकडीवरती हजारो किलोमीटर चा प्रवास पार करून युरोप,रशिया,मध्य आशिया,आफ्रिका, ब्रह्मदेश तसेच भारतीय उपखंडातील काही राज्यांमध्ये व देशांमध्ये आढळणारे अनेक पक्षी प्रजननासाठी दाखल झाले आहेत.
या पिराण टेकडी वरती सद्यस्थितीला नॉर्दर-शॉवलर हा रशिया व युरोप मधील मोठी व चपट्या टोकाची चोच असलेला पक्षी आढळत आहे. तसेच पेंटेड स्टाॅर्क हा भारतातील गुलाबी पंख असलेला स्थानिक पक्षी या ठिकाणी दाखल झाला आहे.तसेच ब्लॅक टेल्ट गॉडविट(युरोप, नेदरलँड),कॉमन टील (युरेशिया), ओस्प्रे (युरोप,रशिया), व्हाईट वॅगटेल (मध्य आशिया), इंडियन स्पॉट- बिल्ड डक (भारत- स्थानिक पक्षी), रिव्हर टर्न (भारत ) स्मॉल प्रेंटेकोल (भारत) बार -हेडेड गूज (तिबेट- मंगोलिया) असे अनेक पक्षी या टेकडीवरती सध्या स्थितीला वास्तव्याला आले आहेत.
या पिराण टेकडीवरती दाखल झालेले पक्षी प्रजनना नंतर नवीन पिढीला जन्म घातल्यानंतर नवजात पिल्लांसह भारतातून आपल्या मायदेशात प्रवासाला काही महिन्यानंतर निघतात. मार्च व एप्रिल महिन्यात उजनी धरणातून व कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर हळूहळू पिराण टेकडी उघडी पडते. त्यानंतर पिराण टेकडीवरती उथळ व टनक जमीन उघडी पडल्याचा परदेशी पक्षांना अचूक अंदाज येतो. यानंतर हे पक्षी हळूहळू या ठिकाणी प्रजननासाठी दाखल होतात. या ठिकाणी एक दोन नव्हे तर हजारोच्या संख्येने अनेक प्रजातीचे पक्षी अधिवासासाठी एकत्र राहत शहा गावातील पिराण टेकडीवरून संपूर्ण जगाला एकात्मतेचा संदेश देतात.
पिराण टेकडी पर्यटन स्थळ म्हणून घोषित होणे गरजेचे…!!
- शहा हे केवळ स्थानिक नव्हे तर आंतरराष्ट्रीय पक्षांसाठी एक सुरक्षित निवासस्थान आहे. या निवासस्थानामध्ये आपणाला हजारो प्रजातीचे जगभरातून प्रजननासाठी दाखल झालेले वेगवेगळे पक्षी पाहावयाला मिळतात. यामधून पर्यावरणातील समतोल, पिराण टेकडीवरील उघड्या झालेल्या जागेचे महत्व व जैवविविधतेची गुंतवणूक स्पष्ट होते. अशा परदेशी पक्षांचे निरीक्षण व संवर्धन हे आपल्या सर्वांसाठी कर्तव्य असून उजनी बॅक वॉटर मधील शहा गावात असलेली पिराण टेकडी एक पर्यटन स्थळ म्हणून घोषित होणे काळाची गरज आहे.
विशाल लोकरे
(पक्षी निरीक्षक-शिराळ,सोलापूर).



