हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभेची निवडणूक लढविणार ; खात्रीलायक सूत्रांची माहिती.?
जनता सांगेल तो पक्ष व चिन्ह.?
इंदापूर,दि.१९
- इंदापूर विधानसभा मतदारसंघाची चर्चा सतत सुरू असताना खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंदापूर विधानसभेची निवडणूक हर्षवर्धन पाटील लढविणार असल्याचे निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे जनता सांगेल तो पक्ष व चिन्ह हर्षवर्धन पाटील हाती घेऊन इंदापूर विधानसभेची निवडणूक लढविणार असून त्याची औपचारिक घोषणा लवकरच केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेली अनेक दिवस इंदापूर विधानसभा एक चर्चेचा विषय बनला आहे.त्यातच इंदापूर विधानसभेची जागा महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेली असल्याची माहिती मिळत असून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून दत्तात्रय भरणे हे उमेदवार असणार आहेत.भाजपमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मात्र,सद्यस्थितीला खात्रीलायक सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात येऊन ठेपलेली इंदापूर विधानसभेची निवडणूक हर्षवर्धन पाटील लढविणार असल्याचे निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे इंदापूर तालुक्यातील जनता सांगेल तो पक्ष व चिन्हांवर इंदापूर तालुक्यातील स्वाभिमानी जनतेसाठी हर्षवर्धन पाटील लढणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घ्यावी अशी सर्वसामान्य तालुक्यातील जनतेसह मुस्लिम बांधवांनी सतत मागणी लावून धरली आहे.
परंतु,अजून पर्यंत हर्षवर्धन पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली नाही. जरी भूमिका जाहीर केली नसली तरी ते इंदापूर विधानसभेची निवडणूक जनतेच्या ताकदीवर व इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी लढणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील नेमका कोणता पक्ष व चिन्ह घेऊन लढणार हे जाहीर केले नसले तरी ते निवडणूक लढविणारच हे निश्चित झाले आहे.