इंदापूरच्या शेती सिंचनासाठी उन्हाळी हंगामासाठी दोन आवर्तने – मंत्री दत्तात्रय भरणे.
खडकवासला कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय.

पुणे,दि.२
- इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी उन्हाळी हंगामात खडकवासला कालव्याला दोन व नीरा डाव्या कालव्याला दोन आवर्तने देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अशी माहिती मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
दि.१ मार्च रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली.
यावेळी खडकवासला कालव्यातून उन्हाळी हंगामासाठी १८ फेब्रुवारी पासून आवर्तन सुरू करण्यात आले आहे. हे आवर्तन संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या हितासाठी येत्या २५ एप्रिल पासून दुसऱे आवर्तन देण्यात यावे. अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांच्या हितासाठी भरणे यांनी या बैठकीत केली ही आग्रही मागणी विचारात घेऊन दुसऱे आवर्तन येत्या २५ एप्रिल पासून सुरू करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.
निरा डावा कालव्यातून इंदापूरच्या शेती सिंचनासाठी उन्हाळी हंगामात दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार निरा डाव्या कालव्याला ११ मार्च ते ३ मे या कालावधीत ५४ दिवसाचे उन्हाळी हंगामातील पहिले तर ४ मे ते २६ जून या कालावधीत ५४ दिवसाचे दुसरे उन्हाळी हंगामातील आवर्तन शेती सिंचनासाठी दिले जाणार आहे.