इंदापूरमध्ये राजकीय भूकंपाची चाहूल? रखडलेल्या विकासामुळे राष्ट्रवादी (अजित पवार गट) मधील मोठा गट शिवसेनेच्या वाटेवर?

इंदापूर, दि.२८
- इंदापूर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आल्याची चर्चा असून, आगामी काही दिवसांत तालुक्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील एका वरिष्ठ नेत्याने शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मधील वरिष्ठ मंत्र्यांसह पक्ष नेतृत्वाशी दोन वेळा सविस्तर चर्चा केल्याचे बोलले जात आहे. मात्र, या चर्चेला अद्याप कोणत्याही पक्षाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार, हा संभाव्य पक्षप्रवेश केवळ राजकीय समीकरणे बदलण्यासाठी नसून, इंदापूर तालुक्याचा रखडलेला विकास, अपुरा निधी आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना गती देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. इंदापूर शहर आणि तालुक्यातील अनेक महत्त्वाची विकासकामे निधीअभावी रखडल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत असून, रस्ते, पाणीपुरवठा, शहरी सुविधा, ग्रामीण भागातील मूलभूत विकासकामे तसेच विविध प्रकल्पांना अपेक्षित गती मिळालेली नसल्याचे बोलले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर, सत्तेत प्रभावी भूमिका असलेल्या शिवसेनेत प्रवेश केल्यास अधिक निधी उपलब्ध होईल आणि तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विचार संबंधित गटामध्ये सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे हा निर्णय राजकीय फायद्यापेक्षा विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो, अशीही चर्चा रंगत आहे.
खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित वरिष्ठ नेत्यासोबत अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच काही लोकप्रतिनिधीही शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत झालेल्या बैठकीत संभाव्य पक्षप्रवेश करणाऱ्यांची यादीही सादर करण्यात आल्याचे समजते. मात्र, या दाव्यालाही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
- राजकीय वर्तुळात या संपूर्ण घडामोडींना अनौपचारिकपणे “ऑपरेशन इंदापूर” असे संबोधले जात असून, हा प्रयोग यशस्वी ठरल्यास पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा आहे. विशेषतः इंदापूरसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या तालुक्यात मोठे पक्षांतर झाल्यास त्याचे पडसाद जिल्ह्याच्या तसेच राज्याच्या राजकारणातही उमटू शकतात.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील प्रभावी पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाल्यास तो पक्षासाठी मोठा राजकीय धक्का मानला जाऊ शकतो, अशीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात आणखी एक चर्चेचा मुद्दा समोर येत आहे.
खरोखरच मोठा पक्षप्रवेश होणार आहे की केवळ राजकीय वातावरण तापवण्यासाठी अफवा पसरवल्या जात आहेत, याबाबतही अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. जर या चर्चा केवळ अफवा ठरल्या, तर त्या नेमक्या कोणाकडून आणि कोणत्या राजकीय हेतूने पसरवल्या जात आहेत, असा प्रश्नही राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. काही जाणकारांच्या मते, अशा चर्चांना अनेकदा स्वपक्षातीलच काही घटकांकडून खतपाणी घातले जाते, जेणेकरून राजकीय दबाव निर्माण होईल किंवा अंतर्गत समीकरणे बदलतील किंवा एखाद्या नेत्याची बदनामी होईल.
दरम्यान, या सर्व चर्चांबाबत संबंधित नेते, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) किंवा शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे या चर्चांना येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष स्वरूप प्राप्त होते की त्या केवळ राजकीय अफवाच ठरतात, याकडे इंदापूर तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राजकीय वर्तुळात मात्र एकच प्रश्न विचारला जात आहे—इंदापूरमध्ये खरोखरच राजकीय भूकंप होणार, की हा फक्त चर्चेचा धुरळा ठरणार?



