The city presents ‘signature/नगराध्यक्षांची ‘सही’ गेली! पालिकेच्या बिलांवर आता मुख्याधिकाऱ्यांचीच मोहोर.
नगराध्यक्षांचे आर्थिक अधिकार कापले; पालिका व्यवहारांची सूत्रे मुख्याधिकाऱ्यांकडे.

इंदापूर,दि १०
- नगरपरिषदांच्या आर्थिक व्यवहारातील अत्यंत महत्त्वाच्या ‘नमुना क्रमांक ६४’ (बिल पेमेंट फॉर्म) वर नगराध्यक्षांची स्वाक्षरी आवश्यक आहे की नाही, यावरून गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय आणि कायदेशीर संभ्रमाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
२०१८ मधील वैधानिक सुधारणेनुसार नगराध्यक्षांचे वित्तीय नियंत्रणाचे अधिकार वगळण्यात आले असल्याने, यापुढे नमुना क्र. ६४ वर केवळ मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी अंतिम राहील, असे राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने स्पष्ट केले आहे. २०१३ च्या लेखा संहितेनुसार या नमुन्यावर मुख्याधिकारी व नगराध्यक्ष दोघांची स्वाक्षरी बंधनकारक होती.
२०१५ च्या सुधारणांना उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यामुळे राज्यात काही ठिकाणी दोघांच्या, तर काही ठिकाणी केवळ मुख्याधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने बिलांची प्रक्रिया पार पडत होती. १६ जुलै २०२६ रोजी उच्च न्यायालयाने संबंधित याचिका निकाली काढल्याने २०१६ मधील स्थगिती आदेश संपला. ३१ मार्च २०१८ च्या ‘महाराष्ट्र अधिनियम २५’ मधील दुरुस्तीनुसार नगराध्यक्षांचे वित्तीय अधिकार आधीच रद्द झाले असल्याने, आता अंतिम मंजुरीचा अधिकार पूर्णतः मुख्याधिकाऱ्यांकडेच आला आहे.
नगरविकास संचालनालयाने सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींना एकसमान कार्यपद्धती लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे जनतेतून थेट निवडल्या जाणाऱ्या नगराध्यक्षांचे अधिकार मर्यादित होत असल्याची तीव्र प्रतिक्रिया लोकनियुक्त नगराध्यक्षांकडून उमटत आहेत.
मुख्याधिकाऱ्यांना अधिकार दिल्याने हा निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने घातक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींमधील समन्वयावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



