इंदापूरमध्ये ‘फुलचंद पान’चा कहर ? तरुणांमध्ये वाढती क्रेझ; अन्न आणि औषध प्रशासनाची डोळेझाक.

इंदापूर,दि.६
- इंदापूर शहरात सध्या ‘फुलचंद पान’ या नावाने विकल्या जाणाऱ्या पानाबाबत नागरिकांमध्ये विविध शंका आणि चर्चांना उधाण आले आहे. अनेक ठिकाणी हे पान मोठ्या प्रमाणावर विकले जात असल्याचे सांगितले जात असून, विशेषतः महाविद्यालयीन तरुणांमध्ये त्याची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. काही ठिकाणी ‘कडक फुलचंद’ म्हणून त्याची विक्री होत असल्याची माहिती समोर येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हे पान खाल्ल्यानंतर काही तरुणांमध्ये चक्कर येणे, मळमळ, उलटी होणे किंवा विचित्र वर्तन दिसल्याच्या घटना चर्चेत आहेत. मात्र, या लक्षणांचे नेमके कारण किंवा या पानामध्ये कोणतेही अमली पदार्थ अथवा इतर घातक रसायने मिसळली जात असल्याचे अधिकृतरीत्या सिद्ध झालेले नाही. त्यामुळे या प्रकरणाची शास्त्रीय तपासणी होणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.
आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की, कोणत्याही खाद्यपदार्थात अथवा पानामध्ये अनधिकृत रासायनिक घटक किंवा आरोग्यास अपायकारक पदार्थ वापरले जात असतील, तर त्याचा मानसिक व शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा उत्पादनांची FDA च्या माध्यमातून प्रयोगशाळेत तपासणी होणे अत्यंत गरजेचे आहे.
दरम्यान, राज्यात अन्न सुरक्षा आणि भेसळविरोधी कारवाया अधिक तीव्र करण्यात येत आहेत. अशा पार्श्वभूमीवर इंदापूरमधील महत्त्वाच्या ठिकाणी व महाविद्यालयासमोर विकणारे ‘फुलचंद पान’चीही अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करावी, तसेच नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
- राज्यात अमली पदार्थांविरोधात कठोर भूमिका घेतली जात असून, तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विविध स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. पुणे आणि परिसरात अमली पदार्थांच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर इंदापूरमध्येही संशयास्पद पदार्थांची विक्री होत असल्यास त्याचा सखोल तपास होणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
नागरिकांचे म्हणणे आहे की, काही पानटपऱ्यांवर विकल्या जाणाऱ्या ‘फुलचंद पाना’मध्ये विशिष्ट पावडर किंवा इतर पदार्थ वापरले जात असल्याची चर्चा आहे. या चर्चांमध्ये तथ्य आहे की नाही, हे अधिकृत तपासणीतूनच स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे अफवांना आळा बसण्यासाठी आणि सत्य समोर येण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने नमुने तपासणीसाठी पाठवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विभागाने वेळेत तपास करून वस्तुस्थिती स्पष्ट केल्यास नागरिकांचा संभ्रम दूर होईल आणि तरुणांच्या आरोग्याशी संबंधित कोणताही धोका असल्यास त्यावर तातडीने उपाययोजना करता येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



