जळालेले डीपी तात्काळ बदला; नवीन डीपी मंजुरीला गती द्या:- सभापती अंकिता हर्षवर्धन पाटील.
ग्रामीण भागातील वीज, पाणी व शेतीच्या प्रश्नांवर जिल्हा परिषदेत जोरदार चर्चा.

इंदापूर,दि ९.
- पुणे जिल्हा परिषद पुणे स्थायी समिती व जलव्यवस्थापन आणि स्वच्छता समितीची महत्त्वपूर्ण सभा जिल्हा परिषद अध्यक्ष मा. वीरधवल जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी ग्रामीण भागातील वाढत्या वीज समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत जळालेले डीपी तात्काळ बदलण्याची आणि नवीन डीपी मंजुरी प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी केली.
उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे ग्रामीण भागात डीपी जळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे निदर्शनास आणून देत त्यांनी, “डीपी जळाल्यानंतर नागरिकांना पिण्याचे पाणी, शेतीसाठी वीजपुरवठा आणि जनावरांच्या पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अहवाल प्राप्त होताच तातडीने नवीन डीपी बसवले जावेत,” अशा स्पष्ट सूचना संबंधित विभागांना दिल्या.तसेच, ज्या गावांमध्ये नवीन डीपीची मागणी प्रलंबित आहे त्या सर्व प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊन युद्धपातळीवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी सभेत केली.
सभेला जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती दिपाली हुलावळे, समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती अमोल नलावडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सभेमध्ये ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. खत, बियाणे व औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून अवास्तव दराने विक्री तसेच निकृष्ट दर्जाच्या साहित्याच्या विक्रीबाबत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित प्रकरणांमध्ये दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.
वाढत्या भारनियमनामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींवरही सभेत चर्चा झाली. जुन्या व धोकादायक वीज पोलचे नूतनीकरण, चोरीस गेलेले किंवा नादुरुस्त डीपी तातडीने बदलण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारणे तसेच महावितरणच्या निष्काळजीपणामुळे घडलेल्या अपघात व आगीच्या घटनांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
सभेच्या शेवटी अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सदस्यांनी मांडलेल्या सर्व विषयांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देत, प्रत्येक विभागप्रमुखाने अद्ययावत माहितीसह सभेला उपस्थित राहून नागरिकांच्या प्रश्नांबाबत अधिक संवेदनशीलतेने काम करावे, असे निर्देश दिले.



