पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात मुसळधार पाऊस; शाळकरी मुलांचे हाल.
जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष.

इंदापूर,दि २७
- पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतुकीलाही अडथळे निर्माण झाले आहेत. ग्रामीण भागातील शाळकरी मुले पावसामुळे अडचणीत सापडली असून, शाळेत जाण्या-येण्यास त्रास होत आहे.
पुणे जिल्ह्यातील पूर्व भागातील इंदापूर, बारामती, दौंड तालुक्यात रात्रभर पाऊस सुरू असून तो आज सकाळी ०७:१५ पर्यंत तसाच सुरू आहे. शनिवार असल्याने विद्यार्थ्यांना सकाळची शाळा निश्चित असते त्यामुळे विद्यार्थी सध्या द्विधा मनस्थिती मध्ये असून प्रशासनाला योग्य निर्णय जाहीर करावा लागणार आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पालकांचे लक्ष जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाकडे लागले आहे. आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर होणार का,या कडे विद्यार्थी व पालकांच्या नजरा लागल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाने परिस्थितीचे परीक्षण करून निर्णय घेण्याची तयारी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, पालकांनी मुलांच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवामान विभागाचा इशारा लक्षात घेता, पुढील काही तास ग्रामीण भागातील मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.



