कृषिमंत्र्यांच्या इंदापूर तालुक्यात शेतकऱ्याची फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या.

इंदापूर,दि.१७
- राज्याचे कृषिमंत्री असलेले दत्तात्रय भरणे यांच्या इंदापूर तालुक्यांमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. या घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा इंदापूर तालुक्याचे नाव संपूर्ण राज्यात चर्चेत आले आहे.
इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथील शेतकरी दत्तात्रय सणस यांनी मागील आठवड्यामध्ये राहत्या घरी आत्महत्या केली असून त्यांच्या आत्महत्येस फायनान्स कंपनी जबाबदार असून त्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आत्महत्याग्रस्त शेतकरी दत्तात्रय सणस यांच्या पत्नी अर्चना दत्तात्रय सणस यांनी भिगवण पोलीस स्टेशनला लेखी अर्ज देऊन केली आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकरी दत्तात्रय सणस हे वडिलोपार्जित शेती करत मोटार रिवायडींग चे काम करत होते. मात्र ते एम्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, पूर्वीचे नाव मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड,(मे. मोतीलाल ओसवाल टॉवर,रहीम तुला, सयानी रोड, परेल- एसटी डेपो समोर, प्रभादेवी, मुंबई-४०००२५) या फायनान्स कंपनीच्या कोणत्याही कर्जदाराला जामीनदार झाले नव्हते. अथवा त्यांच्या मालकीची मिळकत मौजे शेटफळगडे येथील (गट नंबर २८४) कधीही गहाण ठेवला नव्हता.

मात्र, संबंधित फायनान्स कंपनीने सदरची मिळकत गहाण दाखवत आत्महत्याग्रस्त शेतकरी दत्तात्रय सणस यांच्याकडे सतत पैशासाठी तगादा लावल्याने व तुमचे राहते घर व जमीन जप्त करतो अशी सतत भीती दावल्याने आत्महत्याग्रस्त शेतकरी दत्तात्रय सणस यांनी तणावाखाली जाऊन दि.४/९/२०२५ रोजी राहत्या घरी आत्महत्या केली असून या सर्वा घडलेल्या बाबींना संबंधित फायनान्स कंपनी व त्या कंपनीचे वसुली अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी असा लेखी अर्ज आत्महत्याग्रस्त शेतकरी दत्तात्रय सणस यांच्या पत्नी अर्चना दत्तात्रय सणस यांनी भिगवण पोलीस स्टेशन येथे केला आहे.
इंदापूर तालुक्यामध्ये अगोदरच शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाने हातबल झाला आहे. त्यातच सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हाता तोंडाला आलेली पिके जमीनदोस्त होत शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडला आहे. त्यातच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या इंदापूर तालुक्यात शेतकऱ्याने फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याने पुन्हा एकदा इंदापूर तालुका चर्चेत आला आहे.
संबंधित फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी आशिष धापटे, देविदास गायकवाड व इतर संबंधित कर्ज प्रकरण बोगस करणाऱ्या अधिकारी, एजंट तसेच तहसील कार्यालयातील संबंधित हे दत्तात्रय सणस यांच्या आत्महत्या जबाबदार आहेत. असे तक्रारी अर्जामध्ये अर्चना दत्तात्रय सणस यांनी नमूद करत गंभीर आरोप केला आहे.



