पेरूचे दर घसरले; शेतकरी आर्थिक अडचणीत.

इंदापूर,दि.४
- इंदापूर तालुक्यातील तसेच परिसरातील शेतकऱ्यांना यंदा पेरू हे फळ पिक चांगले आले असले तरी बाजारात पेरूला अपेक्षित दर मिळत नाही. व्यापारी व घाऊक बाजारात पेरू चे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघत नाही. या सर्व बाबींमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीमध्ये वाढ झाली आहे.
दरवर्षी चालू हंगामात पेरूला चांगली मागणी असते. मात्र, अनियमित व अवकाळी पावसामुळे उत्पादनाची गुणवत्ता घटली असून यावर्षी बाजारात पुरवठा जास्त आणि खरेदीदार कमी असल्याने दर घसरले आहेत. स्थानिक पातळीवर विक्रीची मर्यादित साधन असून शेतकऱ्यांना पुणे,मुंबई सारख्या मोठ्या बाजारात उत्पादित केलेला माल पोहोचवावा लागतो. त्यामुळे वाहतूक खर्च जास्त असल्याने फायदा कमी होतो.
शेतकऱ्यांना खर्च सुद्धा न निघण्याची वेळ आली आहे.शेतीसाठी घेतलेली कर्ज, मजुरी, खत, औषध, पाणी यावर खर्च वाढला; पण बाजारभाव मात्र दिवसेंदिवस खाली येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांची मागणी आहे की शासनाने किमान हमीभाव जाहीर करून खरेदी व्यवस्था करावी, तसेच निर्यात वाढीसाठी पावले उचलावीत. तसेच स्थानिक पातळीवरती पेरू या पिकांवरती प्रक्रिया उद्योग उभारावेत, सहकारी संस्थांच्या माध्यमातून एकत्रित विक्री व्यवस्था उभारावी, फळ महोत्सव, ऑनलाइन प्लॅटफॉर्म चालू करावेत जेणेकरून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उत्पादित केलेले पेरू फळपिक हे बाहेरच्या मार्केटमध्ये न जाता स्थानिक पातळीवरच त्याला चांगला दर मिळेल.त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होऊन, फळ पिकाची नासाडी होणार नाही. अन्यथा असे न झाल्यास शेतकरी वर्गाला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लक्ष देण्याची गरज..!!
राज्यामध्ये एकाच वर्षात दोन वेळा कृषिमंत्री बदलण्याची वेळ राज्य शासनावरती आली. त्यातच इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावरती नव्याने कृषी मंत्री पदाची जबाबदारी आली आहे. त्यांच्याच इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेरू या पिकाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे पेरू या फळ पिकाचे वाढलेले उत्पादन आणि कमी झालेला बाजार भाव या मध्ये कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लक्ष घालून पेरू फळ पिकाबाबत योग्य निर्णय घेत स्थानिक पातळीवरती प्रक्रिया उद्योगासह शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी प्रयत्न करावेत. तरच पेरू उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीतून बाहेर येऊ शकतो.



